Raigad News: काशीद समुद्रात पुण्यातील तरुणाचा बुडून मृत्यू, ४३ तासांनंतर सापडला मृतदेह
काशीद समुद्रात पुण्यातील तरुणाचा बुडून मृत्यू,
पुण्याहून काशीद समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या तनिष्क मल्होत्रा या २० वर्षीय तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू. ४३ तासांनंतर तटरक्षक दलाच्या मदतीने मृतदेह सापडला.
सायली मेमाणे
रायगड ३ जुलै २०२५ : कोकणातील काशीद समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील एका तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यातील २० वर्षीय तनिष्क मल्होत्रा हा आपल्या तीन मित्रांसोबत मुरुड तालुक्यातील काशीद येथे एकदिवसीय पर्यटनासाठी आला होता. मात्र २ जुलै रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास समुद्रात पोहत असताना तो पाण्यात वाहून गेला आणि तेव्हापासून तो बेपत्ता होता. अखेर ४३ तासांच्या सततच्या शोध मोहिमेनंतर आज ३ जुलै रोजी सकाळी त्याचा मृतदेह सापडला.
काशीद किनाऱ्यावर तनिष्कसह त्याचे मित्र मार्क मिल्टन, वरूण तिवारी आणि पुण्य पाटील हे चौघेजण समुद्रस्नान करत होते. तनिष्क खोल पाण्यात गेला आणि खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यातून बाहेर येऊ शकला नाही. त्याच्या इतर तीन मित्रांना मात्र वाचवण्यात यश आले. तनिष्कच्या शोधासाठी तटरक्षक दल, लाईफगार्ड, मुरुड पोलिस कर्मचारी आणि स्थानिकांनी संयुक्तपणे शोध मोहिम राबवली. आज सकाळी हेलिकॉप्टर आणि अॅडव्हान्स थर्मल ड्रोनच्या सहाय्याने शोध कार्य सुरू असताना पावणे आठ वाजण्याच्या सुमारास तनिष्कचा मृतदेह आढळून आला.
मृतदेह मुरुड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मुरुड पोलिसांनी मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर पर्यटकांमध्ये खळबळ उडाली असून, पावसाळी हंगामात समुद्रकिनाऱ्यांवर जाण्याचा धोका अधोरेखित झाला आहे.
सध्या कोकणातील समुद्रकिनारे, विशेषतः काशीदसारखे पर्यटकप्रिय किनारे, पावसाळी हवामानामुळे अत्यंत धोकादायक बनले आहेत. तरीही काही पर्यटक सुरक्षिततेच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत थेट समुद्रात उतरत असल्याने अशा घटना घडत आहेत. मुरुड पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कुमार देशमुख यांनी पावसाळ्यात समुद्रात पोहण्याचे टाळावे, असे आवाहन केले आहे. तर अनेक पर्यटकांनी जीवितहानी टाळण्यासाठी किमान एक स्पीड बोट तैनात करण्याची मागणी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडे केली आहे.