Rain News: राज्यात 17 NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन हाय अलर्टवर

0
Rain News: राज्यात 17 NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन हाय अलर्टवर

Rain News: राज्यात 17 NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन हाय अलर्टवर

महाराष्ट्रात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर 17 NDRF आणि 6 SDRF पथके तैनात करण्यात आली आहेत. भूस्खलन, पूर आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिली.

पुणे ०७ जुलै २०२६ : महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूर, भूस्खलन आणि वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने संपूर्ण यंत्रणा सतर्क ठेवली असून, राज्यभरात 17 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि 6 राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) पथके तैनात करण्यात आली आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मान्सून काळातील संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन NDRF ची पथके विविध जिल्ह्यांमध्ये पूर्वतयारी म्हणून तैनात करण्यात आली आहेत. पालघर आणि नागपूर येथे प्रत्येकी दोन पथके, तर पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि धाराशिव येथे प्रत्येकी एक पथक कार्यरत आहे. मुंबई शहरात चार NDRF पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. याशिवाय SDRF ची सहा पथके धुळे, नागपूर, नांदेड आणि गडचिरोली येथे तैनात करण्यात आली आहेत.

राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईतील सांताक्रूझ येथे 151.2 मिमी तर कुलाबा येथे 128 मिमी पाऊस झाला आहे. लोणावळा, ताम्हिणी, अंबोना, माथेरान, कर्जत, मुळशी, भिवपुरी आणि खोपोली परिसरातही मुसळधार पावसामुळे भूस्खलनाचा धोका वाढला आहे. या भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून प्रशासनाकडून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक बंद ठेवावी लागली. तसेच पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग, मिसिंग लिंक प्रकल्प परिसर आणि लोणावळा–कर्जत घाट विभागात भूस्खलनामुळे रस्ता व रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. रेल्वे मार्ग सुरळीत करण्यासाठी आणि दरडी हटवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असून संबंधित यंत्रणा घटनास्थळी कार्यरत आहेत.

दरम्यान, मावळ तालुक्यातील घोरावाडी येथे पुराच्या पाण्यात 25 प्रवाशांसह एक बस अडकली होती. NDRF च्या पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका केली. तसेच पाटण परिसरात दरड कोसळून एक घर मातीखाली दबले असून बचावकार्य सुरू आहे. मुंबईतील मानखुर्द येथे इमारत कोसळण्याची दुर्घटनाही घडली असून आपत्कालीन यंत्रणा मदतकार्य करत आहेत.

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून GEO-DSS प्रणालीच्या माध्यमातून हवामान, पूर आणि भूस्खलनाच्या धोक्याचे सातत्याने विश्लेषण करून संबंधित जिल्ह्यांना आणि प्रशासनाला अलर्ट पाठवले जात आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावे, नदीकाठ, डोंगराळ भाग आणि पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांपासून दूर राहावे तसेच आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Also Read: Pune’s Latest Information
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/

Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed