Ratnagiri News: उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई! 2 कोटींचा अवैध मद्यसाठा जप्त
उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई! 2 कोटींचा अवैध मद्यसाठा जप्त
Ratnagiri मध्ये उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई. मुंबई-गोवा महामार्गावर 2 कोटी 11 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त. गोवा-मुंबई तस्करी उघडकीस.
सायली मेमाणे
पुणे ३ सप्टेंबर २०२५ :राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुंबई-गोवा महामार्गावर मोठी कारवाई करत तब्बल २ कोटी ११ लाख ७२ हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. ही कारवाई राजापूर तालुक्यातील पन्हाळे तर्फे सौंदळ येथे करण्यात आली.
गोवा बनावटीच्या विदेशी दारूची मुंबईकडे तस्करी करणाऱ्या दहाचाकी कंटेनरवर धडक कारवाई करत विभागाने १८६६ बॉक्स विदेशी मद्य आणि २५ लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण २ कोटी ३६ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी चालक आसिफ आस मोहम्मद याला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईत दुय्यम निरीक्षक एस. एस. गोंदकर, जवान चंदन पंडीत, निरीक्षक अमित पडळकर, जवान निलेश तुपे आणि जवान मलिक धोत्रे यांनी सहभाग घेतला. प्राथमिक चौकशीत या अवैध दारू तस्करीत आंतरराज्य टोळी कार्यरत असण्याची शक्यता तपासली जात आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा पोलिसांनी स्वतंत्र कारवाई करत जुना बाजार, सावंतवाडी येथील तन्मय सुधाकर पांगम (२२) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गोवा बनावटीची दारू, चारचाकी वाहन आणि इतर साहित्य असा एकूण ३ लाख ५० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई आज पहाटे ३.३० वाजता आचरा तिठा येथे झाली.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग परिसरात गोवा बनावटीच्या दारूची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पोलिसांकडून सुरू असलेल्या अशा कारवायांमुळे दारू माफियांवर लगाम बसणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.