Ratnagiri Triple Murder: रत्नागिरीत ट्रिपल मर्डर प्रकरण, प्रेयसीच्या हत्येनंतर उघडकीस आला तरुणाचा क्रूर चेहरा
रत्नागिरीत ट्रिपल मर्डर प्रकरण, प्रेयसीच्या हत्येनंतर उघडकीस आला तरुणाचा क्रूर चेहरा
रत्नागिरीत दुर्वास पाटील या तरुणाने प्रेयसी भक्ती मयेकरची हत्या करण्यापूर्वी आणखी दोघांचा खून केल्याचा पोलिस तपासात धक्कादायक उलगडा झाला आहे.
सायली मेमाणे
पुणे ४ सप्टेंबर २०२५ : रत्नागिरी जिल्ह्यातील ट्रिपल मर्डर प्रकरणामुळे संपूर्ण कोकण हादरले आहे. रत्नागिरी पोलिसांनी प्रेयसी भक्ती मयेकर हिच्या खुनाच्या तपासात आरोपी दुर्वास पाटील याने फक्त तिचाच नव्हे तर आणखी दोन जणांचा खून केल्याचे उघड केले आहे. या प्रकरणामुळे शहरात प्रचंड खळबळ माजली असून एका मागून एक तीन हत्यांची मालिका उघडकीस आल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे गावातील 16 ऑगस्ट रोजी बेपत्ता झालेल्या भक्ती मयेकरचा मृतदेह आंबा घाटात निर्जन ठिकाणी सापडला होता. तपासानंतर स्पष्ट झाले की भक्तीची हत्या तिच्याच प्रियकराने केली होती. दुर्वास पाटीलवर सतत लग्नाचा तगादा लावला जात होता आणि त्यातूनच या हत्येचे बीज रोवले गेले. भक्तीच्या खुनानेच प्रकरण संपले असते, परंतु तपासाअंती दुर्वासने आणखी दोन हत्यांची कबुली दिल्याने पोलिसांना धक्का बसला.
पहिली हत्या सीताराम वीर (वय 50, वाटद-खंडाळा) याची करण्यात आली होती. सीताराम भक्तीला फोनवरून त्रास देत होता. तो वारंवार अश्लील बोलत होता, ही माहिती दुर्वासला मिळाली. प्रेयसीला सतत छळला जात असल्याने संतापलेल्या दुर्वासने सीतारामला हॉटेलमध्ये बोलावले आणि त्याला मारहाण केली. मारहाण इतकी भयानक होती की सीतारामचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेच्या वेळी सीतारामसोबत त्याचा मित्र राकेश जंगम (वय 28, वाटद-खंडाळा) हाही उपस्थित होता. दुर्वासने राकेशला साक्षीदार राहण्याची भीती होती. पोलिसांना माहिती देईल या शंकेमुळे दुर्वासने त्याचाही खून केला. राकेशची हत्या बारमध्ये करण्यात आली आणि त्याचा मृतदेह आंबा घाटातील दरीत टाकण्यात आला.
यानंतर तिसऱ्या हत्येत प्रेयसी भक्ती मयेकर हिचा जीव घेतला गेला. पोलिसांच्या तपासात दुर्वासने सर्व कबुली दिली आहे. एका प्रकरणाच्या तपासातून आणखी दोन खुनांची मालिका उघड झाल्याने पोलिसांनाही धक्का बसला आहे.
सध्या दुर्वास पाटील पोलिस कोठडीत असून त्याच्यावर तिहेरी खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू असून या खुनांच्या मालिकेमागे आणखी कोणी सहभागी होते का, याचीही चौकशी केली जात आहे. रत्नागिरीत सलग तीन हत्यांनी स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत.
या संपूर्ण प्रकरणाने राज्यात पुन्हा एकदा तरुण-तरुणींच्या नात्यातील तणाव, मोबाईलद्वारे होणारे त्रासदायक प्रकार आणि त्यातून उद्भवणाऱ्या गुन्ह्यांचा मुद्दा चर्चेत आला आहे. समाजात या घटनेची तीव्र नोंद होत असून, पोलिसांच्या तपासानंतर आणखी धक्कादायक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.