RTO News: प्रवाशांच्या सुरक्षेसाठी डिजिटल कवच; वाहनांमध्ये VLT आणि Panic Button अनिवार्य

0
RTO News: प्रवाशांच्या सुरक्षेसाठी डिजिटल कवच; वाहनांमध्ये VLT आणि Panic Button अनिवार्य

RTO News: प्रवाशांच्या सुरक्षेसाठी डिजिटल कवच; वाहनांमध्ये VLT आणि Panic Button अनिवार्य


RTO News: राज्यातील 1.20 लाख प्रवासी वाहनांमध्ये VLT आणि Panic Button बसवले; वर्षभरात 6.30 लाख अलर्ट, केवळ एका महिलेची तक्रार नोंद.

पुणे २२ डिसेंबर २०२५ : राज्यातील सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी परिवहन विभागाने डिजिटल सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट केली असून, सुमारे 1 लाख 20 हजारांहून अधिक प्रवासी वाहनांमध्ये व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस (VLT) आणि पॅनिक बटन बसवण्यात आले आहे. ही प्रणाली प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरत असून, आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत मिळवून देण्याचे काम करते. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत या प्रणालीद्वारे तब्बल 6 लाख 30 हजार 259 अलर्ट आरटीओकडे प्राप्त झाले आहेत.

विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रमाणात अलर्ट येऊनही प्रत्यक्षात केवळ एका महिलेने तक्रार नोंदवली आहे. यावरून ही यंत्रणा केवळ तक्रारींसाठीच नव्हे, तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रभावी ठरत असल्याचे स्पष्ट होते. 2012 मध्ये दिल्लीमध्ये धावत्या बसमध्ये घडलेल्या निर्भया घटनेनंतर देशभरातील सर्व प्रवासी वाहनांमध्ये VLT आणि पॅनिक बटन अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मधील तरतुदींनुसार ही व्यवस्था लागू करण्यात आली असून, त्याची काटेकोर अंमलबजावणी राज्यात सुरू आहे.

या डिजिटल यंत्रणेवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबईतील अंधेरी आरटीओ कार्यालयात कंट्रोल अँड कमांड सेंटर कार्यरत आहे. हे सेंटर 24 तास सुरू असून, मुंबईतील चार आरटीओ कार्यालयांमधील सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रत्येकी आठ तासांच्या शिफ्टमध्ये येथे कार्य करतात. कमांड सेंटरमधील स्क्रीनवर एखादा अलर्ट दिसताच संबंधित वाहन चालकाला तातडीने फोन करून संपर्क साधण्यात येतो आणि नेमकी परिस्थिती समजून घेतली जाते.

जर एखाद्या प्रकरणात महिलांची छेडछाड, गैरवर्तन किंवा गंभीर आपत्कालीन परिस्थिती असल्याचे निदर्शनास आले, तर त्या वाहनाचे लाईव्ह लोकेशन, चालकाचे नाव, परवाना क्रमांक आणि वाहनाची माहिती त्वरित पोलिस विभागाकडे पाठवली जाते. पोलिसांकडून आवश्यक ती कारवाई करण्यात येते आणि त्याचा सविस्तर अहवाल आरटीओकडे सादर केला जातो. त्यामुळे आरटीओ आणि पोलिस यंत्रणेमधील समन्वय अधिक मजबूत झाला आहे.

15 जानेवारी 2025 पासून अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालयात पॅनिक बटनद्वारे येणाऱ्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी स्वतंत्र कमांड अँड कंट्रोल सेंटर सुरू करण्यात आले आहे. वाहनांमध्ये बसवलेल्या VLT प्रणालीमुळे आरटीओला वाहनाचे रिअल टाइम लोकेशन, वेगाची माहिती, स्पीड अलर्ट, जिओ-फेन्सिंग यासारखी महत्त्वाची माहिती मिळते. त्यामुळे केवळ प्रवाशांची सुरक्षा नव्हे, तर वाहतूक नियमांचे उल्लंघन, वेगमर्यादा ओलांडणे आणि मार्गापासून विचलित होणे यावरही नियंत्रण ठेवता येते.

वसई परिसरात कार्यालयातून घरी जात असताना काही दुचाकीस्वार त्रास देत असल्याच्या भीतीने एका महिलेने पॅनिक बटन दाबले होते. मात्र तपासाअंती संबंधित दुचाकीस्वार हे तिच्या कार्यालयातील मित्र असल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तरीसुद्धा, या घटनेमुळे पॅनिक बटन प्रणाली किती जलद आणि कार्यक्षम आहे, हे समोर आले.

राज्यात महिला प्रवासी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही डिजिटल सुरक्षा व्यवस्था विश्वासार्ह ठरत आहे. भविष्यात या प्रणालीचा अधिक प्रभावी वापर करून सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित आणि नियंत्रित ठेवण्याचा आरटीओचा मानस आहे. VLT आणि पॅनिक बटनमुळे राज्यातील प्रवासी वाहतूक आता अधिक सुरक्षिततेकडे वाटचाल करत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed