समृद्धी महामार्गावर अपहरण झालेल्या युवकाची काही तासांत सुटका ६ संशयित वाहनासह ताब्यात

0
समृद्धी महामार्गावर अपहरण झालेल्या युवकाची काही तासांत सुटका ६ संशयित वाहनासह ताब्यात

समृद्धी महामार्गावर अपहरण झालेल्या युवकाची काही तासांत सुटका ६ संशयित वाहनासह ताब्यात

चिखली, पिंपरी-चिंचवड येथून अपहरण केलेल्या युवकाची समृद्धी महामार्गावर महामार्ग पोलिसांनी काही तासांत सुरक्षित सुटका केली. ६ संशयितांना वाहनासह ताब्यात घेतले.

पुणे, ४ सप्टेंबर २०२६ : चिखली, पिंपरी-चिंचवड येथून अपहरण करण्यात आलेल्या युवकाची समृद्धी महामार्गावर महामार्ग पोलिसांनी अवघ्या काही तासांत सुरक्षित सुटका केली. नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे बाभळेश्वर महामार्ग पोलीस पथकाने तातडीने नाकाबंदी आणि शोधमोहीम राबवत अपहरणासाठी वापरलेले वाहन अडवले. या कारवाईत अपहरण झालेला युवक सुरक्षित मिळून आला असून, सहा संशयितांना वाहनासह ताब्यात घेण्यात आले आहे.

२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.२६ वाजता समृद्धी महामार्गावर नियमित पेट्रोलिंग करणाऱ्या बाभळेश्वर महामार्ग पोलीस पथकाला समृद्धी महामार्ग नियंत्रण कक्ष, संभाजीनगर यांच्याकडून माहिती मिळाली. चिखली, पिंपरी-चिंचवड येथून एका युवकाचे अपहरण करण्यात आले असून, काही व्यक्ती त्याला इर्टिगा कारमधून सिन्नरच्या दिशेने घेऊन जात आहेत. त्यानंतर हा युवक नागपूरमार्गे उत्तर प्रदेशात नेला जाण्याची शक्यता असल्याचे नियंत्रण कक्षाकडून पोलिसांना कळवण्यात आले.

माहिती मिळताच बाभळेश्वर महामार्ग पोलिसांनी विलंब न करता समृद्धी महामार्गावरील संबंधित परिसरात शोधमोहीम सुरू केली. महामार्गावरील बॅनेल क्रमांक ५३२ ते ५०२.७ दरम्यान पोलिसांनी नाकाबंदी करत संशयित वाहनाचा शोध सुरू केला. दरम्यान, चॅनेल क्रमांक ५२३ परिसरात पोलिसांना दिलेल्या वर्णनाशी मिळतेजुळते वाहन नागपूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाताना आढळले.

महामार्ग पोलीस पथकाने तत्काळ या वाहनाचा पाठलाग सुरू केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि कौशल्यपूर्ण कारवाईमुळे चॅनेल क्रमांक ५२० येथे इर्टिगा वाहन सुरक्षितपणे अडवण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अपहरण झालेला युवक तसेच सहा संशयित व्यक्ती आढळून आल्या. पोलिसांनी युवकाची सुरक्षित सुटका करून सर्व सहा संशयितांना वाहनासह ताब्यात घेतले.

कारवाईनंतर सर्वांना कोकमठाण टोल नाका येथे आणण्यात आले. तेथे प्राथमिक चौकशी करून चिखली पोलीस ठाणे, पिंपरी-चिंचवड येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी युवक, संशयित व्यक्ती आणि इर्टिगा वाहन कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.

या प्रकरणी चिखली पोलीस ठाणे, पिंपरी-चिंचवड येथे गुन्हा रजि. क्र. ६११/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम १४० (२), १४१ (३), ३५२, ३५१ (२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास संबंधित पोलिसांकडून सुरू आहे.

समृद्धी महामार्गावर नियमित पेट्रोलिंग, नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीवर तातडीने केलेली कारवाई आणि संबंधित पोलीस यंत्रणांमधील प्रभावी समन्वय यामुळे युवकाची वेळेत आणि सुरक्षित सुटका करणे शक्य झाले. महामार्गावर कोणतीही संशयास्पद व्यक्ती, वाहन किंवा घटना आढळल्यास नागरिकांनी तात्काळ महामार्ग पोलिसांच्या ११२ या हेल्पलाइनवर माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही उल्लेखनीय कारवाई अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य, मुंबई प्रवीण साळुंखे, पोलीस अधीक्षक महामार्ग सुरक्षा पथक पुणे परिक्षेत्र डॉ. शिवाजी पवार, पोलीस उपअधीक्षक महामार्ग सुरक्षा पथक पुणे पूर्णिमा बांदल, पोलीस निरीक्षक अहिल्यानगर विभाग सोनाली रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाभळेश्वर पोलीस केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण ठोंबरे आणि त्यांच्या पथकाने केली.

Also Read: Pune’s Latest Information
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/

Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *