Satara Doctor Case: डॉक्टर तरुणीच्या वडिलांशी राहुल गांधींचा थेट संपर्क; “न्याय मिळवून देऊ” – राहुल गांधींचं आश्वासन

0
डॉक्टर तरुणीच्या वडिलांशी राहुल गांधींचा थेट संपर्क; "न्याय मिळवून देऊ" – राहुल गांधींचं आश्वासन

डॉक्टर तरुणीच्या वडिलांशी राहुल गांधींचा थेट संपर्क; "न्याय मिळवून देऊ" – राहुल गांधींचं आश्वासन

साताऱ्यातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणात राहुल गांधी यांनी पीडित वडिलांशी फोनवर संवाद साधला. “आम्ही न्याय मिळवून देऊ” असं गांधी यांनी सांगितलं. वडिलांनी आरोपींना फाशीची मागणी केली आहे.

सायली मेमाणे

पुणे २९ ऑक्टोबर २०२५ : साताऱ्यातील फलटण येथे घडलेल्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात संतापाची लाट उसळली आहे. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त होत असून, या प्रकरणात राजकीय दबाव आणि पोलिस अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. पीडित तरुणीने आत्महत्येपूर्वी आपल्या सुसाईड नोटमध्ये तिला मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचा उल्लेख केला होता. या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट पीडित डॉक्टर तरुणीच्या वडिलांशी संपर्क साधून संवाद साधला.

पीडित वडिलांनी सांगितले की, “राहुल गांधी यांनी आमच्याशी फोनवर सुमारे पाच ते सहा मिनिटं बोलणं केलं. आम्ही त्यांच्याशी मराठीत बोललो आणि त्यांनी आमचं दुःख समजून घेतलं. मी त्यांना सांगितलं की माझ्या मुलीला न्याय मिळावा, आरोपींना फाशी झाली पाहिजे.” त्यांनी पुढे सांगितलं की, “या प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी व्हावी अशीही आम्ही मागणी केली. त्यावर राहुल गांधी म्हणाले की, ‘आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला न्याय मिळवून देऊ. आमच्यावर विश्वास ठेवा.’”

वडिलांनी भावनिक स्वरात सांगितलं की, “शवविच्छेदन अहवालात काय लिहिलं आहे हे आम्हाला समजत नाही. आम्ही साधे लोक आहोत. पण आम्हाला फक्त एवढंच हवंय की ज्यांनी माझ्या मुलीला त्रास दिला, त्यांना कठोर शिक्षा मिळावी. आरोपींना फाशी झाली पाहिजे.” त्यांनी पुढे म्हटलं की, “या प्रकरणाचा तपास संथ गतीने सुरू आहे आणि आम्हाला भीती आहे की आरोपींना न्यायव्यवस्थेचा फायदा मिळेल.”

या घटनेनंतर पीडित तरुणीच्या घरी अनेक नेते भेट देऊन गेले, परंतु वडिलांच्या म्हणण्यानुसार त्यांना बहुतेकांची ओळख नाही. “कोण कोण आले, कोण गेले हे आम्हाला कळत नाही. पण सगळेच आमचं सांत्वन करून जातात. मात्र अजूनही तपासाचा वेग दिसत नाही,” असे ते म्हणाले.

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणात समाजात संताप असून, सोशल मीडियावर #JusticeForDoctor या हॅशटॅगसह नागरिक न्यायाची मागणी करत आहेत. अनेक डॉक्टर संघटनांनी या प्रकरणात निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. राहुल गांधींच्या या थेट संवादामुळे प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. आता तपासाला गती मिळेल आणि आरोपींना शिक्षा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पीडित वडिलांची एकच मागणी आहे – “आमच्या मुलीला न्याय द्या. आरोपींना फाशी हीच योग्य शिक्षा आहे.”

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed