Satara Doctor Suicide Case: महिला डॉक्टर आत्महत्येपूर्वी पुण्यातील आरोपीला केला फोन, पोलिसांनी तपास सुरू
Satara Doctor Suicide Case: महिला डॉक्टर आत्महत्येपूर्वी पुण्यातील आरोपीला केला फोन, पोलिसांनी तपास सुरू
साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्येपूर्वी पुण्यातील आरोपी प्रशांत बनकरला फोन केला. पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेवर बलात्काराचा आरोप; आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली.
सायली मेमाणे
पुणे २५ ऑक्टोबर २०२५ : साताऱ्यातील फलटण तालुक्यातील एका सरकारी हॉस्पिटलमध्ये कार्यरत 28 वर्षीय महिला डॉक्टरने गुरुवारी (23 ऑक्टोबर 2025) रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी तळहातावर सुसाइड नोट लिहिली होती. त्या नोटमध्ये तिने पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांच्यावर मागील पाच महिन्यांत अनेक वेळा बलात्कार आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. तसेच, पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या प्रशांत बनकरने तिचा मानसिक छळ केला असल्याचेही तिने नमूद केले आहे.
महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी पुण्यातील प्रशांत बनकरला फोन करून संवाद साधला होता. पोलिसांच्या चौकशीत हे समोर आले आहे की, दोघांमध्ये मेसेजद्वारेही संपर्क होत होता. महिला डॉक्टर फलटणमध्ये प्रशांत बनकरच्या वडिलांच्या फ्लॅटमध्ये भाडेतत्त्वावर राहत होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची दखल घेत सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (SP) तुषार दोशी यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला आणि सुसाइड नोटमध्ये नाव उल्लेख झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले की, फलटण शहर पोलीस ठाण्यात बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला गेला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहेत. महिला डॉक्टराचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला आहे, तर सुसाइड नोटमध्ये नमूद आरोपांची चौकशी सुरू आहे.
कोल्हापूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले की, आतापर्यंत गोळा केलेल्या पुराव्यांनुसार प्रकरणाचा तपास चालू आहे आणि आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केले गेले आहे. महिला डॉक्टरच्या नातेवाईकांनी देखील दावा केला की, तिला कामाच्या ठिकाणी दबावाचा सामना करावा लागत होता आणि काही वरिष्ठ कर्मचारी तिला त्रास देत होते.
सातारा डॉक्टर आत्महत्येच्या घटनेमुळे राज्यातील हॉस्पिटल्समध्ये महिला कर्मचार्यांच्या सुरक्षिततेसंबंधी प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेत त्यांच्या पकडीसाठी तातडीने पथकं तयार केली आहेत, तर न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.