Satara Hill Marathon 2025: 14 सप्टेंबरला शहरातील वाहतूक बंद, वाचा संपूर्ण पर्यायी मार्ग
साताऱ्यात 14 सप्टेंबर रोजी होणाऱ्या 'सातारा हिल मॅरेथॉन' मुळे शहरातील वाहतूक सकाळी 5 ते 10 या वेळेत बंद राहणार आहे.
साताऱ्यात 14 सप्टेंबर रोजी होणाऱ्या ‘सातारा हिल मॅरेथॉन’ मुळे शहरातील वाहतूक सकाळी 5 ते 10 या वेळेत बंद राहणार आहे. जाणून घ्या मॅरेथॉन मार्ग आणि पर्यायी मार्गांची माहिती.
सायली मेमाणे
पुणे १२ सप्टेंबर २०२५ : साताऱ्यात 14 सप्टेंबर रोजी होणाऱ्या ‘सातारा हिल मॅरेथॉन’ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. या मॅरेथॉनमुळे रविवारी सकाळी 5 ते सकाळी 10 या वेळेत मॅरेथॉन मार्गावर सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद राहणार आहे. रुग्णवाहिका, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना वगळता, इतर सर्व वाहनांना मॅरेथॉनच्या मार्गावरून वाहतूक करता येणार नाही.
स्पर्धेची सुरुवात पोलीस परेड ग्राउंडवरून होईल. त्यानंतर स्पर्धक पोवई नाका-मरिआई कॉम्प्लेक्स, शाहू चौक, न्यायालय वाडा मार्गे समर्थ मंदिर बोगदा, येवतेश्वर, प्रकृती हेल्थ रिसॉर्टच्या पुढे 500 मीटरपर्यंत पोहोचतील आणि परत त्याच मार्गाने पोलीस परेड ग्राउंडवर येतील. या मार्गावर सर्व वाहनांना प्रवेश बंद राहणार असल्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बाँबे रेस्टॉरंट चौकातून शहरात येणाऱ्या वाहनांसाठी जिल्हा परिषद चौक-कनिष्ठ हॉल चौक-रिमांड होम मार्ग-जुना आर. टी. ओ. चौक किंवा बांधकाम भवन-उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय चौक-मुथा चौक-रिमांड होम मार्ग-जुना आर. टी. ओ. चौक-सुभाषचंद्र बोस चौक (भुविकास चौक) असा पर्यायी मार्ग उपलब्ध आहे.
मुख्य बसस्थानक, राधिका सिग्नलहून महामार्गाकडे जाणाऱ्या वाहनांनी ग्रेड सेपरेटर मार्गे शहराबाहेर निघावे. तसेच सज्जनगड, ठोसेघर आणि परळी परिसरातून ये-जा करणाऱ्या वाहनांना शेंद्रे मार्गे खिंडवाडी रोड, शिवराज पेट्रोल पंप, अंजठा चौक आणि गोडोली मार्गाने जावे, त्यानंतर ग्रेड सेपरेटर मार्गे डी. बी. कदम मार्केट-राधिका सिग्नल येथून शहरात प्रवेश करता येईल.
कास बाजूकडून येणाऱ्या वाहनांसाठी मॅरेथॉन संपेपर्यंत प्रकृती हेल्थ रिसॉर्ट मार्गे शहरात प्रवेश करणे शक्य नाही. या वाहनांसाठी एकीव फाटा-एकीव-मोळेश्वर-कुसुंबीपुरा-कुरुंबी-मेंढा या पर्यायी मार्गांचा वापर करणे सुचवण्यात आले आहे.
सातारा हिल मॅरेथॉनमुळे शहरातील नागरिकांनी वेळेवर पोहोचणे आणि पर्यायी मार्गांचा वापर करणे गरजेचे आहे. मॅरेथॉनच्या मार्गावर पोलीस आणि प्रशासनिक कर्मचारी तैनात राहतील, जेणेकरून मार्ग सुरळीत राहील आणि नागरिकांचा प्रवास सुरक्षित होईल.
या मॅरेथॉनमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था काही काळ प्रभावित होईल, मात्र पर्यायी मार्ग वापरल्यास नागरिकांचा प्रवास सुरळीत राहील. स्थानिक प्रशासनाने नागरिकांशी संपर्क साधून सर्व वाहनधारकांना मार्गांबाबत सुचना दिल्या आहेत.