Satara News: महाबळेश्वरच्या हॉटेलमधून लाखोंचं साहित्य चोरलं, दुबईला पळण्याच्या प्रयत्नात मुंबई विमानतळावर अटक
महाबळेश्वरच्या हॉटेलमधून लाखोंचं साहित्य चोरलं
महाबळेश्वरच्या हॉटेलमधून 10 लाखांचे साहित्य चोरून दुबईला पळ काढणाऱ्या चोरट्याला मुंबई विमानतळावर अटक, दोन भंगार व्यावसायिकही ताब्यात.
सायली मेमाणे
पुणे १० जुलै २०२५ : सातारा – महाबळेश्वरमधील प्रसिद्ध ऑक्सिजन हॉटेलमधून लाखो रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य, फर्निचर आणि भांडी चोरून भंगारात विकल्यानंतर थेट दुबईला पळून जाण्याच्या तयारीत असलेला एक चोरटा एलसीबीच्या पथकाने मुंबई विमानतळावर शिताफीने अटक केला. आरोपीसह त्याच्या दोन भंगार व्यावसायिक साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली असून, एकूण १७ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही घटना २५ जून ते २८ जून दरम्यान घडली असून, हॉटेलच्या मालकाच्या तक्रारीनंतर सातारा पोलीस आणि एलसीबीने तातडीने तपास सुरु केला. पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर आणि एलसीबी निरीक्षक अरुण देवकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. घटनास्थळी पोहोचून तपास करणाऱ्या पथकाला प्राथमिक चौकशीत हॉटेलमधील एका कामगारावर संशय आला.
दरम्यान, एलसीबीच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली की, प्रमुख आरोपी कांचन कालीप्रसाद बनर्जी (वसई) दुबईला पळून जाण्याच्या तयारीत आहे. तपास पथकाने तत्काळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर धाव घेतली. सहार पोलिसांच्या मदतीने आरोपीला चेक-इन करत असतानाच अटक करण्यात आली.
अटक केल्यानंतर आरोपीने चोरीची कबुली दिली असून, त्याने चोरीचे साहित्य साताऱ्यातील करण दशरथ घाडगे व गौतम सुरेश जाधव या भंगार व्यावसायिकांकडे विकल्याची माहिती दिली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत त्यांच्या गोडावूनवर छापा टाकून चोरी केलेले 10 लाखांचे साहित्य जप्त केले. या प्रकरणात वापरलेला ट्रक आणि टेम्पोही जप्त करण्यात आला आहे.
या गुन्ह्यामुळे महाबळेश्वर परिसरात सुरक्षेविषयी चिंता व्यक्त होत असून, हॉटेल्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासणे गरजेचे असल्याचा सूर पोलिसांमध्ये आहे. पोलिसांनी या घटनेत आणखी कोणी सामील आहे का, याचा तपास सुरू ठेवला आहे. व्यवसायिक क्षेत्रात विश्वासघात करणाऱ्या घटनांमुळे हॉटेल इंडस्ट्रीसाठी धोक्याची घंटा ठरणाऱ्या या घटनेची राज्यभर चर्चा होत आहे.