Shaktipeeth Express News: वाळव्यात शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध; एक इंच जमीनही देणार नाही, शेतकरी संघटनांचा इशारा
Shaktipeeth Express News: वाळव्यात शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध; एक इंच जमीनही देणार नाही, शेतकरी संघटनांचा इशारा
वाळवा तालुक्यातील शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला शेतकरी संघटनांचा तीव्र विरोध. “विकासाच्या नावाखाली शेतकरी उद्ध्वस्त करण्याचा कट” असल्याचा आरोप, 27 फेब्रुवारीला मोर्चाचा इशारा.
पुणे ०४ जानेवारी २०२६ : शक्तीपीठ एक्सप्रेस महामार्गाच्या प्रस्तावित मार्गाला वाळवा तालुक्यातून तीव्र विरोध होत असून, “एक इंच जमीनही देणार नाही” असा ठाम इशारा शक्तीपीठ विरोधी शेती बचाव संघर्ष समितीने दिला आहे. विकासाच्या नावाखाली शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण जनतेला उद्ध्वस्त करण्याचा हा सुनियोजित कट असल्याचा आरोप करत श्रमिक मुक्ती दलाचे ज्येष्ठ नेते डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार टीका केली. सिंचनाखालील सुपीक शेती, गावे आणि संपूर्ण ग्रामीण जीवन उद्ध्वस्त करणारा महामार्ग कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. पाटणकर म्हणाले की, सिंचनासाठी रक्त सांडलेल्या हुतात्म्यांच्या बलिदानातून उभी राहिलेली जमीन कोणत्याही प्रकल्पासाठी देण्याचा प्रश्नच येत नाही. देवधर्माच्या नावाखाली शक्तीपीठाचा मुलामा देऊन काही भांडवलदारांच्या फायद्यासाठी लाखो शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा हा डाव आहे. कृष्णा–वारणा खोऱ्यातील सुपीक जमीन, सिंचन योजना, धरणग्रस्तांचे पुनर्वसन, ग्रामीण रस्ते आणि गावांचा नैसर्गिक संपर्क तोडणारा हा महामार्ग म्हणजे ग्रामीण महाराष्ट्राच्या मानेवरचा फास असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या महामार्गाचा मार्ग वाळवा तालुक्यातील मसुचीवाडी, नवे व जुनेखेड वाळवा, उरुण, येडेनिपाणी, कामेरी, येलूर, इटकरे कुरळप, ऐतवडे मार्गे कोल्हापूर जिल्ह्यात जाणार असल्याची माहिती देण्यात आली. यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या मार्गाला तीव्र विरोध झाल्याने तो बदलून वाळवा तालुक्यात आणण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. जर तीव्र विरोध हाच निकष असेल, तर वाळवा तालुक्यातही त्याहून अधिक तीव्र विरोध केला जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला.
पत्रकार परिषदेला बी. जी. पाटील (बळीराजा शेतकरी संघटना), कॉ. धनाजी गुरव (श्रमिक मुक्ती दल लोकशाहीवादी), शंकर महापुरे (दलित महासंघ), कॉ. दिग्विजय पाटील, प्रा. रणजित चव्हाण, अजित हवालदार (संभाजी ब्रिगेड) आणि संतोष गोठणकर (धरणग्रस्त संघटना) यांची प्रमुख उपस्थिती होती. बी. जी. पाटील यांनी सांगितले की, या महामार्गामुळे पूरधोका वाढेल, पाणी साचून शेती नापीक होईल आणि ऊस तसेच इतर पिकांच्या वाहतुकीवर गंभीर परिणाम होणार आहे. सरकारने हा प्रकल्प तात्काळ रद्द केला नाही, तर शेतकरी, शेतमजूर, धरणग्रस्त आणि कष्टकरी जनतेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या पार्श्वभूमीवर 27 फेब्रुवारी रोजी ईश्वरपूर प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका सुरू असल्याने, शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा की विरोध याबाबत प्रत्येक पक्ष आणि उमेदवाराला गावागावांत जाब विचारला जाईल, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. अन्यथा उमेदवारांनी आपली स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी धनाजी गुरव यांनी केली. शक्तीपीठ महामार्गाविरोधातील हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information