Shardul Thakur बाबा झाला! विजय हजारे ट्रॉफीआधी ठाकूर कुटुंबात नवा पाहुणा, चाहत्यांमध्ये आनंदाची लाट
Shardul Thakur बाबा झाला! विजय हजारे ट्रॉफीआधी ठाकूर कुटुंबात नवा पाहुणा, चाहत्यांमध्ये आनंदाची लाट
Shardul Thakur Father News: टीम इंडियाचा अष्टपैलू शार्दुल ठाकूर आणि मिताली पारुलकर झाले पालक; विजय हजारे ट्रॉफीआधी मुलाचा जन्म, सोशल मीडियावर खास पोस्ट.
पुणे २२ डिसेंबर २०२५ : टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरच्या घरी आनंदाची बातमी आली आहे. 2025-26 विजय हजारे ट्रॉफी सुरू होण्याआधीच शार्दुल ठाकूर आणि त्याची पत्नी मिताली पारुलकर यांनी एका गोंडस मुलाचे स्वागत केले आहे. या खास क्षणाची माहिती शार्दुलने स्वतः सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांसोबत आनंद व्यक्त केला आहे. शार्दुल पहिल्यांदाच बाबा झाला असून, या बातमीमुळे क्रिकेटविश्वात आणि चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.
शार्दुल ठाकूरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “पालकांच्या हृदयात लपलेले, शांतता, विश्वास आणि असीम प्रेमाने संरक्षित. आमचे रहस्य अखेर उघड झाले आहे. स्वागत आहे मुला, आम्ही नऊ महिने शांतपणे जोपासलेले स्वप्न.” या भावनिक पोस्टसोबत त्यांनी बाळाच्या आगमनाचा आनंद साजरा केला. या पोस्टवर क्रिकेटपटू, सहकारी खेळाडू आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
शार्दुल ठाकूर आणि मिताली पारुलकर यांचे लग्न 27 फेब्रुवारी 2023 रोजी पार पडले होते. लग्नापूर्वी दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते. मितालीने शार्दुलच्या करिअरमधील कठीण टप्प्यांमध्ये त्याला खंबीर साथ दिली असून, दोघेही सोशल मीडियावर अनेकदा एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात. आता त्यांच्या आयुष्यात नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे.
क्रिकेटच्या मैदानावर पाहिले तर सध्या शार्दुल ठाकूर मुंबई क्रिकेट संघाचा तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नसली, तरी रणजी ट्रॉफीमध्ये संघाने चांगली झुंज दिली होती. आता आगामी विजय हजारे ट्रॉफीमध्ये शार्दुल ठाकूर मुंबई संघाचे नेतृत्व करणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत रोहित शर्मा देखील मुंबई संघाकडून खेळताना दिसणार आहे.
वडील झाल्यानंतर शार्दुल ठाकूर पहिल्या सामन्यापासून संघाचे नेतृत्व करणार की नाही, याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. मात्र, शार्दुलच्या फिटनेस आणि व्यावसायिक शिस्तीवर पाहता तो संघासोबत पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अलीकडेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने चांगली कामगिरी करत पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये पुनरागमनासाठी आपला दावा मजबूत केला आहे.
शार्दुल ठाकूरने आतापर्यंत भारतासाठी 13 कसोटी सामने, 47 एकदिवसीय आणि 25 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. महत्त्वाच्या सामन्यांमध्ये निर्णायक कामगिरी करण्यासाठी ओळखला जाणारा शार्दुल सध्या पुन्हा एकदा राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी मेहनत घेत आहे.
आयपीएलच्या दृष्टीने पाहिले तर मागील सिझनमध्ये शार्दुल ठाकूर अनसोल्ड राहिला होता. मात्र, सिझनच्या मध्यात लखनऊ सुपर जायंट्सने त्याला संघात सामावून घेतले. त्यानंतर आगामी आयपीएल 2026 साठी लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील ट्रेडनंतर शार्दुल ठाकूर आता मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याच्याकडून आगामी सिझनमध्ये मोठ्या अपेक्षा आहेत.
एकीकडे मैदानावर मोठ्या स्पर्धेचे आव्हान आणि दुसरीकडे आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण, अशा दुहेरी आनंदात शार्दुल ठाकूर सध्या आहे. विजय हजारे ट्रॉफीआधी बाबा झाल्याने हा काळ शार्दुलसाठी अत्यंत खास ठरत आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information