Shirdi News: साईबाबांचे रांग न लावता थेट दर्शन; VIP पास, ब्रेक दर्शन व नवीन योजना जाणून घ्या
Shirdi News: साईबाबांचे रांग न लावता थेट दर्शन; VIP पास, ब्रेक दर्शन व नवीन योजना जाणून घ्या
Shirdi News: शिर्डी साई मंदिरात आता रांग न लावता झटपट साईदर्शन शक्य. VIP पास, ब्रेक दर्शन वेळा, 10 हजार देणगी योजना आणि ऑनलाइन दर्शन पासची संपूर्ण माहिती वाचा.
पुणे 0६ डिसेंबर २०२६ : शिर्डीतील साईबाबा समाधी मंदिरात दर्शनासाठी देश-विदेशातून दरवर्षी कोट्यवधी भाविक दाखल होतात. सण-उत्सव, नववर्ष, गुरुपौर्णिमा आणि सलग सुट्ट्यांच्या काळात भाविकांची संख्या प्रचंड वाढत असल्याने दर्शनासाठी अनेकदा पाच तासांहून अधिक वेळ लागतो. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी साईबाबा संस्थान ट्रस्टकडून विविध सुविधा राबवण्यात येत असून मार्च 2025 पासून काही महत्त्वाच्या योजना अधिक प्रभावीपणे अंमलात आणण्यात आल्या आहेत. या योजनांमुळे आता रांग न लावता किंवा कमी प्रतीक्षेत थेट साईदर्शन घेण्याचा मार्ग भाविकांसाठी खुला झाला आहे.
साईसंस्थानकडून 112 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अद्ययावत दर्शन रांग संकुलात 12 प्रतिक्षा हॉल असून एकावेळी सुमारे 20 हजार भाविक थांबू शकतात. तरीही गर्दीच्या कालावधीत हे सर्व हॉल भरून जातात. अशा वेळी 200 रुपयांचा VIP दर्शन पास भाविकांसाठी मोठा आधार ठरतो. आधारकार्ड किंवा वैध ओळखपत्र दाखवून कोणतीही शिफारस न घेता हा पास मिळतो. VIP पासधारकांना स्वतंत्र रांगेतून प्रवेश दिला जात असला तरी, समाधी मंदिराजवळ सर्व रांगा एकत्र येत असल्याने गर्दीच्या दिवसांत VIP रांगही लांब होते.
याच पार्श्वभूमीवर साईसंस्थानकडून ब्रेक दर्शन प्रणाली राबवली जाते. या सुविधेत भाविकांना कोणतीही रांग न लावता थेट साईदर्शन मिळते. ठराविक वेळेत मंदिरातील एक बाजूची दर्शनरांग काही काळ थांबवून ब्रेक दर्शन दिले जाते. सकाळी 9 ते 10, दुपारी 2.30 ते 3.30 आणि रात्री 8 ते 8.30 या तीन वेळांत ब्रेक दर्शन होते. यासाठी किमान 24 तास आधी नोंदणी आवश्यक असून जनसंपर्क कार्यालयामार्फत आधारकार्ड आणि मोबाईल क्रमांकाच्या आधारे पडताळणी केली जाते. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर अधिकृत SMS मिळाल्यावर शिर्डीत आल्यानंतर VIP ब्रेक दर्शन पास दिला जातो.
मार्च 2025 पासून साईसंस्थानने आणखी एक महत्त्वाची योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेनुसार 10 हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक देणगी दिल्यास एका देणगी पावतीवर एकावेळी पाच जणांना झटपट दर्शन किंवा एक VIP आरती दर्शनाचा मान मिळतो. या सुविधेत भाविकांना कोणतीही रांग लावावी लागत नाही आणि देणगी पावतीवरच आरती किंवा दर्शनाचा उल्लेख असल्याने संबंधित प्रवेशद्वारातून थेट प्रवेश दिला जातो.
भाविकांसाठी ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. online.sai.org.in या संकेतस्थळावर मोबाईल क्रमांक व OTP किंवा ईमेल आयडीच्या माध्यमातून लॉग इन करून दर्शन पास, VIP सेवा आणि इतर सुविधा घेता येतात. ऑनलाइन पासची पावती दाखवल्यावर प्रवेशद्वार क्रमांक सहा मधून थेट प्रवेश मिळतो. गर्दी नसलेल्या काळात साधारण एका तासात साईदर्शन होते. या सर्व योजनांमुळे शिर्डी साई मंदिरात भाविकांना अधिक सुलभ, जलद आणि नियोजनबद्ध दर्शनाचा अनुभव मिळत आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information