Shirpur News: ATM बाहेर गाडी, नागरिकाचा सतर्कपणा; मध्यरात्री चोर-पोलिसांचा थरार, मोठा कट उधळला
Shirpur News: ATM बाहेर गाडी, नागरिकाचा सतर्कपणा; मध्यरात्री चोर-पोलिसांचा थरार, मोठा कट उधळला
Shirpur ATM Theft News: शिरपूरमध्ये मध्यरात्री ATM मशीन चोरीचा कट उधळला. नागरिकाच्या 112 कॉलमुळे दोन आरोपी अटकेत. युट्यूबवरून चोरीचे तंत्र शिकल्याचा धक्कादायक खुलासा.
पुणे १८ जानेवारी २०२५: धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात मध्यरात्री एटीएम मशीन उखडून नेण्याचा मोठा कट पोलिसांनी उधळून लावला असून, एका सतर्क नागरिकाच्या वेळीच दिलेल्या माहितीतून हा गुन्हा हाणून पाडण्यात यश आले आहे. ‘११२’ या आपत्कालीन क्रमांकावर आलेल्या कॉलमुळे पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि चोरट्यांचा डाव फसवण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांनी युट्यूबवरील व्हिडिओ पाहून चोरीचे तंत्र शिकल्याची धक्कादायक कबुली दिली आहे.
शनिवार, १७ जानेवारी रोजी रात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास शिरपूर शहरातील बँक ऑफ बडोदाच्या एटीएमसमोर एक पिकअप वाहन आणि तीन संशयास्पद तरुण उभे असल्याचे एका जागरूक नागरिकाच्या लक्षात आले. वाहनाला लोखंडी साखळी बांधलेली दिसल्याने एटीएम मशीन उखडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय त्याला आला. क्षणाचाही विलंब न करता नागरिकाने ‘११२’ या आपत्कालीन क्रमांकावर माहिती दिली. माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी तत्काळ हालचाली सुरू करत घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांचे वाहन जवळ येत असल्याचे पाहताच चोरट्यांनी पिकअप वाहन घेऊन भोरखेडा, चोपडा रोडच्या दिशेने पलायन केले. यानंतर शिरपूर पोलिस आणि चोरट्यांमध्ये थरारक पाठलाग सुरू झाला. काही अंतरावर पोलीस जवळ येत असल्याचे लक्षात येताच आरोपींनी आपले वाहन रस्त्यावरच सोडून दिले आणि अंधाराचा फायदा घेत जंगलात पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळी सोडून दिलेल्या वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये एक मोबाइल फोन आणि फास्टॅग आढळून आला. हे दोन्ही पुरावे पुढील तपासासाठी महत्त्वाचे ठरले.
मोबाइल क्रमांक, वाहनाची माहिती आणि फास्टॅगच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. त्यानंतर दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये हेमंत सुकलाल माळी (वय २१, रा. भिलडाई, धुळे) आणि विधूर देवा जाधव उर्फ विजू (वय ३८, रा. वसंत नगर, पारोळा, जि. जळगाव) यांचा समावेश आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी शिरपूरमधील एटीएम चोरीच्या प्रयत्नासह यापूर्वी अमळनेर आणि धुळे शहरात केलेल्या एटीएम चोरीच्या गुन्ह्यांचीही कबुली दिली आहे.
तपासात समोर आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी एटीएम मशीन साखळीने ओढून कसे उखडायचे, याचे प्रशिक्षण थेट युट्यूबवरील व्हिडिओ पाहून घेतले होते. या पद्धतीचा वापर करून संपूर्ण मशीनच वाहनात टाकून पळवण्याचा त्यांचा डाव होता. मात्र नागरिकाच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे हा गुन्हा घडण्याआधीच उधळून लावण्यात आला.
या घटनेनंतर शिरपूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ ‘११२’ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा. नागरिक आणि पोलिसांच्या समन्वयातूनच गुन्हेगारीला आळा घालता येतो, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सध्या शिरपूर पोलीस या टोळीने राज्यातील इतर भागातही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा अधिक तपास करत आहेत.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information