शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव बदलून सेंट मेरी? काँग्रेस आमदाराची मागणी आणि भाजपची टीका
शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव बदलून सेंट मेरी? काँग्रेस आमदाराची मागणी आणि भाजपची टीका
काँग्रेसचे आमदार रिझवान अर्शद यांनी शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव बदलून सेंट मेरी ठेवण्याची मागणी केली, मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला; भाजपने तुष्टीकरणाचे राजकारण असल्याची टीका केली.
सायली मेमाणे
पुणे ११ सप्टेंबर २०२५ : कर्नाटकमधील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव बदलण्याची वादग्रस्त मागणी आता राजकारणाच्या मध्यभागी आली आहे. काँग्रेसचे आमदार रिझवान अर्शद यांनी या स्टेशनचे नाव बदलून सेंट मेरी ठेवावे अशी मागणी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून, त्यांनी केंद्र सरकारकडे पत्र पाठवून नाव बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.
शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव बदलण्याच्या या प्रस्तावाने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आदरणीय आहेत. त्यांचे नाव असलेल्या स्टेशनचे नाव बदलण्याचा प्रस्ताव अनेकांना चुकीचा आणि अवमानकारक वाटत आहे.
मागील आठवड्यात बेंगळुरूतील सेंट मेरी बॅसिलिका येथे आयोजित वार्षिक मेजवानीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपस्थित होते. यावेळी आर्चबिशप पीटर माचाडो यांनी बॅसिलिकाच्या नूतनीकरणासाठी निधीची मागणी केली आणि पिंक लाईनवरील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनला सेंट मेरीचे नाव देण्याची विनंती केली. मुख्यमंत्री यांनी या दोन्ही मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला, ज्यामुळे हा राजकीय वाद अधिक तीव्र झाला.
भाजपने या निर्णयावर टीका करत म्हटले आहे की, काँग्रेस काही विशिष्ट लोकांच्या तुष्टीकरणासाठी प्रो मॅक्स लेव्हलचे राजकारण करत आहे. त्यांनी असेही म्हटले की, स्टेशनचे नाव एखाद्या सन्माननीय स्थानिक व्यक्तीच्या नावावर असावे. काही प्रस्तावांमध्ये अभिनेते शंकर नाग यांच्या नावावर स्टेशनचे नाव ठेवण्याची मागणी देखील समोर आली होती. मात्र, सध्या निवडलेले नाव ‘सेंट मेरी’ आहे, जे शिवाजी महाराजांच्या नावाच्या आदराशी सुसंगत नाही, असा संताप भाजपने व्यक्त केला.
शिवाजीनगर मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे आमदार रिझवान अर्शद हेच या नाव बदलण्याची मागणी करणारे आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि शिवप्रेमींमध्येही प्रश्न निर्माण झाला आहे की, आपल्या राज्यातील सत्ताधाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचे का वावडे आहे? यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी देखील आपले मत मांडले पाहिजे, असा आवाज काही राजकीय वर्तुळांमध्ये उठत आहे.
राजकारणाच्या या वादग्रस्त निर्णयामुळे सोशल मीडियावर देखील चर्चेला तळ वाढली आहे. काहींनी कर्नाटक सरकारला जागरूक राहण्याची सूचना केली आहे, तर काहींनी काँग्रेसवर तुष्टीकरणाचे राजकारण करण्याचा आरोप केला आहे. यामुळे भविष्यातील निर्णयासाठी केंद्र सरकारकडूनही प्रतिक्रिया अपेक्षित आहे.
शिवाजी महाराजांचे नाव बदलण्याचा हा प्रकार फक्त स्थानिक नसून राष्ट्रीय स्तरावरही चर्चेचा विषय ठरत आहे. राजकारणी, नागरिक आणि इतिहासप्रेमींमध्ये यावर तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. केंद्र सरकारकडे पत्र पाठवून नाव बदलण्याच्या मागणीवर आता निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत या वादाचे राजकीय आणि सामाजिक परिणाम स्पष्ट होतील.