51 वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 पुणे ग्रामीणमध्ये भव्यरित्या सुरू; 900 पेक्षा अधिक खेळाडूंचा सहभाग
51 वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 पुणे ग्रामीणमध्ये भव्यरित्या सुरू; 900 पेक्षा अधिक खेळाडूंचा सहभाग
पुणे ग्रामीणमध्ये 51 वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2025ची भव्य सुरुवात. SP सदिपसिंह गिल्ल यांच्या उपस्थितीत उद्घाटन; 900 पुरुष व 250 महिला खेळाडूंचा सहभाग. पहिल्या दिवशी अनेकांनी सुवर्णपदक पटकावले
१७ नोव्हेंबर २०२५ : 51 वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 या वर्षी पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या उपमुख्यालय, बन्हाणपुर (बारामती) येथे अत्यंत उत्साहात सुरू झाली. 17 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 2025 या कालावधीत ही स्पर्धा विविध मैदानांवर होणार असून यावर्षी आयोजनाची जबाबदारी पुणे ग्रामीण पोलीस दलावर आहे. उद्घाटन समारंभात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सदिपसिंह गिल्ल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच अपर पोलीस अधीक्षक रमेश चापड, उपविभागीय पोलीस अधिकारी, अधिकारी आणि अमलदारही या प्रसंगी उपस्थित होते. मान्यवरांच्या स्वागतासाठी अकलुजच्या यमाई हलगी ग्रुपने हलगीवादन केले. त्यानंतर सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी (बारामती विभाग) यांनी रोपटी देऊन मान्यवरांचे स्वागत केले. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या बँड पथकाने मानवंदना दिल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल शाहरूख शेख यांनी मशाल रन करत मैदानावर क्रीडा स्पर्धेची ज्वाला प्रज्वलित केली. त्यानंतर सर्व खेळाडूंनी शपथ घेत स्पर्धेच्या प्रारंभाला भरघोस प्रतिसाद दिला.

या स्पर्धेची खास वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे कोल्हापूर परिक्षेत्रातील खेळाडूंनी सलग 11 वेळा महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेतील सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. या कामगिरीबद्दल उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड यांनी विशेष कौतुक करून सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. उद्घाटन सोहळ्यात SP सदिपसिंह गिल्ल यांनी खेळाडूंना संबोधित करताना शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि खेळाडूवृत्तीचे महत्त्व अधोरेखित केले.
या क्रीडा स्पर्धेत 7 विविध सांघिक खेळ प्रकार आणि 12 वैयक्तिक खेळ प्रकारांचा समावेश असून, पुणे ग्रामीण, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि सोलापूर शहर या घटकांमधून 900 पुरुष आणि 250 महिला पोलीस कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले आहेत. स्पर्धा विद्याप्रतिष्ठान मैदान, पोलीस उपमुख्यालय परेड ग्राउंड बन्हाणपुर, अॅग्रो ट्रस्ट मैदान शारदानगर आणि वीर सावरकर जलतरण तलाव येथे पार पडणार आहेत.
खेळांविषयी मुलांमध्ये उत्सुकता निर्माण करण्यासाठी बारामती आणि भिगवण येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, थोरात इंग्लिश स्कूल आणि धाडीबा आबाजी सातव हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनीही मैदानावर भेट देऊन विविध वैयक्तिक आणि संघिक खेळांचा आनंद घेतला.
पहिल्या दिवशीच्या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदके पटकावली. 10000 मीटर पुरुष धावण्यामध्ये साताऱ्याच्या हर्षवर्धन दबडे यांनी सुवर्ण पदक जिंकले. 5000 मीटर महिला स्पर्धेत पुणे ग्रामीणच्या ऋतुजा कांबळे यांनी चमकदार कामगिरी केली. 800 मीटर पुरुष धावण्यात कोल्हापूरच्या ओंकार कुंभार यांनी उत्तम कामगिरी करत सुवर्ण प्राप्त केले. लांब उडी महिला स्पर्धेत आरती फाळके (सातारा) आणि पुरुष गटात निहाल मोरे (सातारा) यांनी सुवर्ण पटकावले. 110 मीटर हर्डल्स पुरुष गटात कोल्हापूरचे अमृत तिवळे तर 100 मीटर महिला हर्डल्समध्ये साताऱ्याची वैश्नवी शिंदे विजयी ठरली.
उद्घाटन समारंभाचा समारोप करताना पोलीस उपअधीक्षक राजेंद्र मायने यांनी आयोजन समितीचे आणि स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंचे आभार मानले. या स्पर्धांमुळे पोलीस दलामध्ये केवळ तंदुरुस्तीच नव्हे, तर परस्परांतील एकी, शिस्त आणि संघभावना मजबूत होत असल्याचे त्यांनी सांगितले.