शरद पवारांना धक्का! राष्ट्रवादीचे दोन आमदार शिवसेना (शिंदे गट) संपर्कात?
शरद पवारांना धक्का! राष्ट्रवादीचे दोन आमदार शिवसेना (शिंदे गट) संपर्कात?
सोलापूरमध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे दोन आमदार शिवसेना (शिंदे गट) संपर्कात असल्याच्या चर्चांना उधाण.
सायली मेमाणे
पुणे २२ सप्टेंबर २०२५ : सोलापूर – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. सर्व राजकीय पक्ष गाव ते जिल्हा पातळीपर्यंत आपली ताकद दाखवण्यास उत्सुक आहेत. मात्र निवडणुकांपूर्वीच राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीच्या चर्चांना गती मिळालेली आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे दोन आमदार शिवसेना (शिंदे गट) संपर्कात असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात उधाण निर्माण केले आहे.
मागील काही महिन्यांपासून महाविकास आघाडीतील काही आमदार महायुतीच्या संपर्कात असल्याचे वृत्त सतत माध्यमांमध्ये समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकांपूर्वी उघड होत असलेल्या या हालचालींमुळे राज्याच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा पक्ष प्रवेश आणि नेत्यांच्या भूमिकांवर प्रश्न निर्माण होण्याचे संकेत दिसत आहेत.
शिवसेना (शिंदे गट) ने सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे नुकतीच आढावा बैठक घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आयोजित या बैठकीत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी कार्यकर्त्यांना अधिकाधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, “जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांतील यशाचा परिणाम थेट विधानसभेवर होईल.”
या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार नारायण पाटील उपस्थित होते, ही बाब विशेष चर्चेचा विषय ठरली. माहिती नुसार, पाटील या बैठकीत सक्रिय सहभाग घेताना दिसले. यापूर्वी मोहोळ येथे झालेल्या अशाच बैठकीत आणखी एक आमदार, राजू खरे देखील सहभागी झाले होते.
पाटील यांनी आपल्या भूमिकेवर भाष्य करताना सांगितले की, “मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चाच आमदार आहे. मात्र एकनाथ शिंदे हे कार्यक्षम नेते आहेत. मतदारसंघातील विकासकामांसाठी त्यांच्याशी माझा नियमित संपर्क असतो.” त्यांनी पक्षांतराच्या चर्चांना सध्या नकार दिला, तरी शिंदे गटाच्या संघटनात्मक बैठकीत थेट सहभाग घेतल्यामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी या प्रकारच्या हालचाली महाविकास आघाडीसाठी चिंतेची बाब ठरू शकतात. या राजकीय हालचालीमुळे निवडणुकांच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवर पक्षांतराच्या चर्चांमुळे जनता आणि कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.
राजकीय वर्तुळात सुरु असलेले हे चर्चांचे स्वरूप फक्त सोलापूरपुरते मर्यादित नसून, राज्याच्या राजकीय नकाशावर मोठ्या उलथापालथीच्या संकेत देत आहे. आगामी निवडणुकीत या घडामोडींवर सर्वच पक्ष नजर ठेवून आहेत, कारण स्थानिक निवडणुकीचे निकाल विधानसभेवरील सत्तास्थितीवर थेट परिणाम करू शकतात.