Tamhini Ghat Accident: नवी थार घेऊन निघालेल्या 6 मित्रांचा 500 फूट दरीत दुर्दैवी अंत
Tamhini Ghat Accident: नवी थार घेऊन निघालेल्या 6 मित्रांचा 500 फूट दरीत दुर्दैवी अंत
ताम्हिणी घाटातील 500 फूट दरीत नवी थार कार कोसळून सहा मित्रांचा मृत्यू. दोन दिवसांच्या शोधानंतर ड्रोनने गाडीचा तुकडा दिसला आणि भीषण अपघात उघडकीस आला.
सायली मेमाणे
पुणे २१ नोव्हेंबर २०२५ : ताम्हिणी घाटातील अलीकडील भीषण अपघाताने पुन्हा एकदा या मार्गावरील धोकादायक परिस्थिती समोर आणली आहे. नवी कोरी थार कार घेऊन कोकण सफरीसाठी निघालेल्या पुण्यातील सहा मित्रांचा 500 फूट खोल दरीत झालेल्या अपघातात दुर्दैवी अंत झाला. दोन दिवसांपासून हे तरुण बेपत्ता असल्याने त्यांच्या कुटुंबीयांची आणि मित्रांची चिंता वाढली होती. मात्र, ड्रोनच्या सहाय्याने करण्यात आलेल्या शोध मोहिमेदरम्यान दरीत गाडीचा तुकडा दिसताच या दुर्घटनेचे भीषण स्वरूप उघडकीस आले. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने परिसरात तसेच जिल्ह्यातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
अवघ्या 20 दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या नव्या थार कारमधून पुण्यातील साहिल गोठे (24), शिवा माने (20), प्रथम चव्हाण (23), श्री कोळी (19), ओमकार कोळी (20) आणि पुनीत शेट्टी (21) हे सहा मित्र कोकणातील फिरस्तीचा बेत आखत 18 तारखेला रात्री एकच्या सुमारास प्रवासाला निघाले. मात्र त्यांचा हा आनंददायी प्रवास ताम्हिणी घाटातील एका धोकादायक वळणावर अचानक थांबला. पहाटेच्या सुमारास कारवरील नियंत्रण सुटताच वाहन थेट 500 फूट दरीत कोसळले आणि सहाही जण जागीच ठार झाले.
पोलिसांना संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांनी शोधमोहीम सुरु केली. मित्रपरिवारानेही सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केले. पोलिसांनी या तरुणांच्या मोबाईल लोकेशनचा माग घेतला असता त्यांचे शेवटचे लोकेशन ताम्हिणी घाट परिसरात असल्याचे स्पष्ट झाले. मात्र प्रत्यक्ष ठिकाणी तपासासाठी पोहोचल्यावर गाडी किंवा या तरुणांचा काहीच मागमूस लागला नाही. दरी अतिशय खोल आणि दाट झाडांनी आच्छादित असल्याने साध्या नजरेस काहीच दिसत नव्हते.
शेवटी ड्रोन उडवून दरीच्या तळाशी तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ड्रोन फुटेजमध्ये गाडीचा तुकडा क्षीण स्वरूपात दिसताच तातडीने शोध पथकांना पाचारण करण्यात आले. दोरखंड, क्रेन, बचाव उपकरणे यांच्या सहाय्याने मोठ्या परिश्रमांनंतर पथकाने दरीत उतरून शोधमोहीम सुरू केली. काही तासांच्या प्रयत्नांनंतर अपघातग्रस्त गाडीत सहाही तरुणांचे मृतदेह सापडले. अत्यंत कठीण परिस्थितीत बचाव पथकांनी मृतदेह वर आणताच कुटुंबीयांना; या हृदयद्रावक घटनेची माहिती देण्यात आली. या बातमीने कोंडवे कोपरे आणि आसपासच्या परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला.
या मार्गावर अनेकदा अपघात होतात, विशेषतः अंधारे उतार आणि तीव्र वळणांमुळे वाहनचालकांना नियंत्रण राखणे कठीण होते. प्रशासनाकडून रस्त्यावरील सुरक्षा उपाय अधिक मजबूत करण्याची आवश्यकता पुन्हा एकदा समोर आली आहे. स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनीही ताम्हिणी घाटातून प्रवास करताना अधिक जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. सहा तरुणांचा अशा भीषण अपघातात मृत्यू झाल्याने या दुर्घटनेने सर्वांच्या मनात वेदना आणि प्रश्न निर्माण केले आहेत. आनंदाच्या प्रवासाला निघालेले हे सहा मित्र एका क्षणात कुटुंबीयांपासून कायमचे दूर गेले आणि या शोकांतिकेने सर्वत्र दु:खाची लाट उसळली आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information