Tanisha Bhise Death Case: दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी; हृदयनाथ व उषाताई मंगेशकरांसह 11 जणांवर खटला
Tanisha Bhise Death Case: दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी; हृदयनाथ व उषाताई मंगेशकरांसह 11 जणांवर खटला
गर्भवती तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी पुणे धर्मादाय आयुक्तांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी ठरवले. पैसे न भरल्याने उपचारात विलंब, मंगेशकर कुटुंबीयांसह 11 विश्वस्तांवर फौजदारी खटला दाखल.
०४ जानेवारी २०२६ : पुणे : गर्भवती तनिषा भिसे यांना आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर वैद्यकीय उपचार आणि रुग्णवाहिकेची सुविधा न दिल्याप्रकरणी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरला पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दोषी ठरवले आहे. लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन संचलित या नामांकित धर्मादाय रुग्णालयाविरोधात करण्यात आलेली ही कारवाई अत्यंत गंभीर मानली जात असून, पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या इतिहासातील ही पहिलीच इतकी कठोर आणि निर्णायक कारवाई ठरली आहे.
संयुक्त धर्मादाय आयुक्त राजनी किरण क्षीरसागर यांनी दिलेल्या आदेशात रुग्णालय प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक वैद्यकीय उपचार देण्यात कसूर केल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. तसेच रुग्णाची प्रकृती गंभीर असताना तिला वेळेत दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासाठी आवश्यक व्यवस्था न केल्याने रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या निष्कर्षामुळे राज्यभरात खासगी आणि धर्मादाय रुग्णालयांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू मागील वर्षी एप्रिल महिन्यात झाला होता. उपचार सुरू करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने 10 लाख रुपयांची अनामत रक्कम मागितल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. ही रक्कम तत्काळ भरता न आल्यामुळे उपचार सुरू करण्यात विलंब झाला आणि परिस्थिती गंभीर बनत गेली. वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्यानेच तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. या घटनेनंतर राज्यभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत विधी व न्याय विभाग, मंत्रालय यांच्या निर्देशानुसार रुग्णालयाविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली. संयुक्त धर्मादाय आयुक्तांनी या प्रकरणाची स्वयंप्रेरित म्हणजेच सुओ मोटो चौकशी सुरू केली. या चौकशीसाठी उपधर्मादाय आयुक्त (पुणे) डॉ. राजेश परदेशी, रुग्णालय शाखेचे अधीक्षक दीपक खराडे, निरीक्षक सचिन बकाळ आणि रवींद्र गावरे यांचा समावेश असलेल्या विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली होती.
सखोल तपासणीनंतर रुग्णालय प्रशासनाकडून वैद्यकीय निष्काळजीपणा झाल्याचे स्पष्ट झाले. रुग्णालयाने धर्मादाय रुग्णालय म्हणून असलेली सामाजिक जबाबदारी पाळली नसल्याचा ठपकाही चौकशीत ठेवण्यात आला. चौकशी अहवालाच्या आधारे पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक सचिन बकाळ यांनी रुग्णालय आणि त्याच्या 11 विश्वस्तांविरोधात फौजदारी खटला दाखल केला आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये मंगेशकर कुटुंबातील प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे. विश्वस्तांमध्ये पंडित हृदयनाथ मंगेशकर, भारती मंगेशकर, उषाताई मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर यांच्यासह डॉ. धनंजय केळकर, डॉ. जितेंद्र क्षीरसागर, अॅड. पी. एम. खिरे, सचिन व्यवहारे, आर. पी. जोशी आणि डॉ. प्रसाद राजहंस यांची नावे आहेत. या कारवाईमुळे समाजात मोठी खळबळ उडाली असून, नामांकित रुग्णालयांनाही कायद्याच्या चौकटीत जबाबदार धरले जाऊ शकते, हा संदेश यातून स्पष्ट झाला आहे.
तनिषा भिसे मृत्यूप्रकरणामुळे आरोग्य सेवा क्षेत्रातील आर्थिक अटी, आपत्कालीन उपचारांची जबाबदारी आणि रुग्णांचे मूलभूत हक्क या मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाचा निकाल भविष्यातील रुग्णालय व्यवस्थापनासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information