Tata Group News: पुण्याच्या किर्लोस्करांचा जावई नेविल टाटा ठरणार रतन टाटांचे उत्तराधिकारी? टाटा घराण्यात मोठा फेरबदल
पुण्याच्या किर्लोस्करांचा जावई नेविल टाटा ठरणार रतन टाटांचे उत्तराधिकारी? टाटा घराण्यात मोठा फेरबदल
टाटा समूहात मोठा फेरबदल होत असून, रतन टाटा यांच्या सावत्र भावाचे पुत्र नेविल टाटा आता सर दोराबजी टाटा ट्रस्टमध्ये सामील झाले आहेत. किर्लोस्कर घराण्याचा जावई असलेला नेविल टाटा ‘नोएल गट’ मजबूत करण्याच्या दिशेने मोठे पाऊल मानले जात आहे.
सायली मेमाणे
१२ नोव्हेंबर २०२५ : मुंबई – भारतातील सर्वात प्रतिष्ठित औद्योगिक समूहांपैकी एक असलेल्या टाटा समूहात (TATA Group) मोठे फेरबदल होत असल्याचे संकेत आहेत. रतन टाटा यांच्या निधनानंतर समूहात बदल, वाद आणि गटबाजीची चिन्हं अधिक स्पष्ट होत आहेत. विशेष म्हणजे, पुण्याच्या किर्लोस्कर घराण्याशी नाते असलेले नेविल टाटा, हे आता रतन टाटा यांच्या उत्तराधिकार्यांच्या यादीत अग्रस्थानी येत आहेत.
रतन टाटा यांनी आयुष्यभर कुटुंबापासून दूर राहून, टाटा समूह आणि त्याच्या ट्रस्टचा कारभार पूर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोनातून चालवला. मात्र, त्यांच्या निधनानंतर समूहात गटबाजी वाढल्याचं दिसून येत आहे. नोएल टाटा, जे रतन टाटांचे सावत्र भाऊ आहेत, त्यांनी आता समूहातील प्रमुख ट्रस्टपैकी एक सर दोराबजी टाटा ट्रस्ट मध्ये आपला मुलगा नेविल टाटा याची एन्ट्री करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
नोएल टाटांनी नेविलला ट्रस्टमध्ये स्थान देऊन पुढच्या पिढीला जबाबदारी देण्याची सुरुवात केल्याचं स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर, या निर्णयामागे ‘नोएल गट’ मजबूत करण्याचा राजकीय हेतू असल्याचंही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
नेविल टाटाची ही एन्ट्री अशा वेळी झाली आहे, जेव्हा रतन टाटांचे निकटवर्तीय मेहल मिस्त्री यांना ट्रस्टमधून वगळण्यात आलं. मेहल मिस्त्री हे टाटा सन्सचे सुमारे 27.98% भागीदार आहेत, त्यामुळे हा बदल समूहाच्या निर्णय प्रक्रियेत मोठा प्रभाव टाकणारा ठरणार आहे.
विशेष म्हणजे, नेविल टाटा हे पुण्याच्या किर्लोस्कर घराण्याचे जावई आहेत. या नातेसंबंधामुळे नेविल टाटा आणि टाटा समूहाला महाराष्ट्रातील उद्योगजगताशी आणखी मजबूत संबंध मिळतील, अशी चर्चा सुरू आहे. किर्लोस्कर समूहाचे देशातील उद्योग क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान आहे आणि दोन्ही घराण्यांच्या या नात्यामुळे औद्योगिक सामर्थ्य वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नोएल टाटा आणि रतन टाटा यांचं नातं
रतन टाटा हे नवल टाटा आणि त्यांच्या पहिल्या पत्नी सुनी टाटा यांचे पुत्र आहेत, तर नोएल टाटा हे नवल टाटा आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी सिमोने टाटा यांचे पुत्र आहेत. त्यामुळे रतन आणि नोएल हे सावत्र भाऊ आहेत. रतन टाटा आणि त्यांचा भाऊ जिम्मी टाटा यांनी लग्न केलं नाही आणि त्यांना मुलं नाहीत. त्यामुळे टाटा समूहातील पुढची सूत्रं नोएल टाटांच्या हातात गेली आहेत.
नोएल टाटा हे टाटा इंटरनॅशनल, ट्रेंट लिमिटेड आणि व्होल्टास सारख्या कंपन्यांशी संबंधित असून, त्यांनी टाटा समूहात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. आता त्यांच्या मुलाला ट्रस्टमध्ये स्थान मिळाल्याने पुढील पिढी टाटा वारशात औपचारिकरीत्या सहभागी झाल्याचं स्पष्ट होतं.
रतन टाटांच्या निधनानंतरचे बदल
रतन टाटा यांच्या निधनानंतर समूहात अनेक संघटनात्मक बदल झाले आहेत. नोएल टाटांच्या नेतृत्वाखाली समूहात टाटा कुटुंबाची पुन्हा भागीदारी वाढविण्याचा प्रयत्न होत आहे. रतन टाटांनी त्यांच्या काळात ट्रस्ट आणि कंपन्यांच्या प्रशासनातून कुटुंबीयांना दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नोएल टाटांनी आता कुटुंबाला पुन्हा ट्रस्ट आणि बोर्डाच्या केंद्रस्थानी आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
औद्योगिक क्षेत्रातील विश्लेषकांच्या मते, “नेविल टाटाला ट्रस्टमध्ये स्थान मिळणं म्हणजे टाटा समूहातील वारसत्त्वाचं स्पष्ट संकेत आहे. नेविल हा पुढील काळात टाटा समूहाच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत प्रमुख भूमिका बजावू शकतो.”
टाटा समूह सध्या जागतिक बाजारपेठेत नव्या गुंतवणुकींच्या आणि डिजिटल क्षेत्रातील विस्ताराच्या दिशेने वाटचाल करत आहे. या पार्श्वभूमीवर नवीन नेतृत्वाची निवड आणि पुढील पिढीचा सहभाग हा समूहासाठी निर्णायक टप्पा ठरू शकतो.