Thane Dengue-Malaria Update: ठाण्यात 4 महिन्यांत 621 मलेरिया आणि 405 डेंगू रुग्ण; किवी-पपया फळांच्या भावात वाढ
ठाण्यात 4 महिन्यांत 621 मलेरिया आणि 405 डेंगू रुग्ण; किवी-पपया फळांच्या भावात वाढ
Thane Health Alert: ठाण्यात गेल्या चार महिन्यांत 621 मलेरिया आणि 405 डेंगू रुग्ण आढळले. डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे किवी, ड्रॅगन फ्रुट आणि पपयांची मागणी वाढली असून फळांच्या किंमतीत वाढ झाली आहे.
सायली मेमाणे
पुणे ८ ऑक्टोबर २०२५ : ठाणे शहरात डेंगू आणि मलेरियाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या चार महिन्यांत ठाण्यात तब्बल 621 मलेरियाचे आणि 405 डेंगूचे रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. या वाढत्या आकडेवारीमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली असून महानगरपालिकेने रोगनियंत्रणासाठी उपाययोजना अधिक कडक केल्या आहेत.
सध्याच्या हवामानातील बदल आणि डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या आजारांचे प्रमाण वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ठाण्यातील विविध भागांमध्ये डास निर्मूलन मोहीम, फॉगिंग, व ओला कचरा व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात येत आहे. परंतु तरीही काही भागांमध्ये नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे आजारांचा धोका कायम असल्याचे दिसत आहे.
रुग्णसंख्या वाढल्यानंतर डॉक्टरांकडून रुग्णांना आहारात नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे फळांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जात आहे. विशेषतः पपया, ड्रॅगन फ्रुट, आणि किवी हे फळ प्लेटलेट्स वाढविण्यासाठी उपयुक्त असल्याने त्यांची मागणी अचानक वाढली आहे. काही डॉक्टर पपयाचा पाला किंवा त्याचा रस सेवन करण्याचाही सल्ला देत आहेत.
या वाढलेल्या मागणीचा परिणाम थेट बाजारभावांवर झाला आहे. ठाण्यातील मुख्य फळबाजारांमध्ये किवीचे दर प्रति किलो 450 ते 500 रुपयांपर्यंत गेले आहेत, तर ड्रॅगन फ्रुट 350 ते 400 रुपयांदरम्यान विकले जात आहे. पपयाचे दरदेखील मागील महिन्यांच्या तुलनेत 30% ने वाढले आहेत. विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, रोज सकाळी फळांच्या दुकानांवर या फळांची खरेदी करणाऱ्यांची गर्दी वाढत आहे.
नागरिकांमध्ये या आजारांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी ठाणे महापालिकेकडून जनजागृती मोहिमेची सुरुवात झाली आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना डेंगू आणि मलेरियाच्या प्रतिबंधक उपायांविषयी माहिती दिली जात आहे. तसेच प्रत्येक गल्लीत, सोसायटीत आणि सार्वजनिक ठिकाणी पाणी साचणार नाही, यासाठी विशेष उपाय केले जात आहेत.
आरोग्य विभागाने नागरिकांना सूचना केली आहे की, घराभोवती स्वच्छता राखावी, साचलेले पाणी त्वरित काढून टाकावे आणि डास चावू नयेत म्हणून मॉस्किटो रेपेलंटचा वापर करावा. नागरिकांनी थकवा, ताप, डोकेदुखी किंवा अंगदुखी अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.
ठाण्यात वाढलेल्या या परिस्थितीमुळे फक्त आरोग्य क्षेत्रच नव्हे तर फळबाजार आणि किराणा क्षेत्रातही हालचाल वाढली आहे. आरोग्य तज्ञांच्या मते, पुढील काही आठवडे निर्णायक ठरतील आणि योग्य काळजी घेतल्यास या आजारांचा प्रसार थांबवता येईल.