Thane News: ठाणे महापालिकेची 250 कोटींची पाणी बिल थकबाकी! वसुली मोहिमेत प्रशासनाची धडपड
ठाणे महापालिकेची 250 कोटींची पाणी बिल थकबाकी! वसुली मोहिमेत प्रशासनाची धडपड
ठाणे महापालिकेची पाणी बिल थकबाकी तब्बल 250 कोटींपर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत फक्त 43 कोटींची वसुली; न भरल्यास पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा.
सायली मेमाणे
पुणे २९ ऑक्टोबर २०२५ : ठाणे महापालिकेच्या पाणी बिल वसुली मोहिमेला गती मिळाली असली तरी प्रशासनाला अजून मोठ्या रकमेच्या थकबाकीचा सामना करावा लागत आहे. शहरातील पाणी बिलांची थकबाकी तब्बल 250 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली असून, त्यापैकी 92 कोटी 28 लाख रुपये ही थकबाकीपोटीची रक्कम आहे, तर चालू वर्षाची बिल रक्कम 157 कोटी 80 लाख रुपये इतकी आहे.
एप्रिल 2025 पासून आतापर्यंत फक्त 43 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे, जी एकूण वसुलीच्या केवळ 18 टक्के इतकी आहे. थकबाकीदारांकडून रक्कम वसूल न झाल्यास संबंधितांची नळ जोडणी खंडित करून पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या आर्थिक वर्षात 100 टक्के वसुलीचे उद्दिष्ट्य ठेवले असून, विभागांना त्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. मागील वर्षी 2024-25 मध्ये 148 कोटी 95 लाख रुपयांची वसुली झाली होती, जी 2023-24 च्या तुलनेत सुमारे 15 कोटींनी अधिक होती.
अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात आहे. दर सोमवारी वसुलीचा आढावा घेतला जाणार असून, अहवाल न सादर केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे सूचित करण्यात आले आहे. मंगळवारी मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या बैठकीत उपनगर अभियंता विनोद पवार यांनी सर्व कार्यकारी अभियंते, उप अभियंते आणि मीटर रीडर यांना मार्गदर्शन केले.
शहरातील सर्व प्रभागात नळ जोडणी खंडित करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर रूम सील करणे अशी सक्त कारवाई सुरू आहे. तसेच, खंडित जोडणी पुन्हा कार्यान्वित केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचीही चेतावणी देण्यात आली आहे.
ठाणे महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, पाणी बिलाची थकबाकी त्वरित भरून प्रशासनास सहकार्य करावे, अन्यथा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल.