तिलक वर्माचा धक्कादायक खुलासा: ग्लोव्हज कापून काढावे लागले; रबडोमायोलिसिस आजारातून थोडक्यात बचाव

0
तिलक वर्माचा धक्कादायक खुलासा: ग्लोव्हज कापून काढावे लागले; रबडोमायोलिसिस आजारातून थोडक्यात बचाव

तिलक वर्माचा धक्कादायक खुलासा: ग्लोव्हज कापून काढावे लागले; रबडोमायोलिसिस आजारातून थोडक्यात बचाव

टीम इंडियाचा स्टार फलंदाज तिलक वर्मा याने रबडोमायोलिसिस या जीवघेण्या आजारातून कसा बचाव केला, जाणून घ्या त्याची खरी कहाणी.


सायली मेमाणे

पुणे २४ ऑक्टोबर २०२५ : मुंबई : आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये भारताला विजेतेपद मिळवून देणारा तिलक वर्मा आज प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या ओठांवर आहे. पण या यशामागे एक हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट दडलेली आहे. भारताच्या मधल्या फळीतील या तरुण फलंदाजाने स्वतःच्या जीवावर बेतलेला एक अनुभव उघड केला आहे.

गौरव कपूरच्या लोकप्रिय शो ब्रेकफास्ट विद चॅम्पियन्समध्ये तिलक वर्माने आपल्या आयुष्यातील तो भयावह क्षण सांगितला, जेव्हा त्याला रबडोमायोलिसिस (Rhabdomyolysis) नावाचा जीवघेणा आजार झाला होता. हा आजार झाल्यावर त्याचे शरीर पूर्णतः थकले, हात काम करणं बंद झाले, आणि ग्लोव्हज कापून काढावे लागले.

तिलकने सांगितलं की, वर्ष 2022 मध्ये तो इंडिया ए कडून बांग्लादेशविरुद्ध सीरिज खेळत होता. त्या सामन्यात त्याची शतकाच्या दिशेने वाटचाल सुरु होती. पण अचानक त्याला डोळ्यांसमोर काळोख जाणवू लागला. “माझे हात आणि बोटं काम करणं थांबले. शरीर दगडासारखं झालं. मला वाटलं की आता काहीतरी गंभीर घडतंय,” असे तिलकने सांगितले.

त्या वेळी त्याला मैदानातून रिटायर हर्ट व्हावे लागले. शरीर इतके आकडले होते की हातातील ग्लोव्हज कापून काढावे लागले. त्यानंतर त्याला तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले.

रबडोमायोलिसिस हा असा आजार आहे ज्यात शरीरातील स्नायू तुटायला लागतात आणि त्यातून मायोग्लोबिन नावाचे रसायन रक्तात मिसळते. हे रसायन किडनीसाठी अत्यंत घातक असते आणि त्यामुळे मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढतो. या आजाराची लक्षणे म्हणजे प्रचंड अशक्तपणा, स्नायू दुखणे, उलट्या, आणि मूत्राचा गडद रंग.

तिलक वर्मा सांगतो, “माझी स्थिती इतकी गंभीर झाली होती की डॉक्टर म्हणाले, थोडा अजून उशीर झाला असता तर माझा जीव गेला असता.”

तिलकने या प्रसंगी आकाश अंबानी आणि जय शाह यांच्या मदतीचेही स्मरण केले. “मी आज जिवंत आहे, कारण त्यांनी वेळेत पाऊल उचललं,” असे तो भावनिक होत म्हणाला. माझ्या तब्येतीबद्दल समजताच आकाश अंबानी यांनी जय शाह यांच्याशी संपर्क साधला आणि लगेच मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या तातडीच्या निर्णयामुळे माझा जीव वाचला.”

तिलक वर्मा आज भारतीय क्रिकेटमधील उगवता तारा आहे. आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याने खेळलेली शानदार खेळी त्याच्या पुनरागमनाची जणू घोषणा होती. पण त्याच्या या यशामागे एका जीवघेण्या आजाराशी लढलेला योद्धा लपलेला आहे.

क्रिकेटप्रेमींनी आता केवळ त्याच्या बॅटिंगचं नाही, तर त्याच्या आयुष्याशी केलेल्या संघर्षाचंही कौतुक केलं आहे. तिलक वर्माची ही कहाणी अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरत आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *