Vasai News: वसईत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात गोणीत सापडले नवजात बाळ; रडण्याचा आवाज ऐकून उघड झाला संतापजनक प्रकार
Vasai News: वसईत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात गोणीत सापडले नवजात बाळ
वसईत जुन्या खाडी पुलाखाली कचऱ्याच्या ढिगारात एका महिन्याच्या बाळाला प्लास्टिकच्या गोणीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघड; पोलीस तपास सुरू.
सायली मेमाणे
पुणे ११ जुलै २०२५ : वसई – पालघर जिल्ह्यातील वसई परिसरात एका हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. कळंब परिसरातील जुन्या खाडी पुलाखाली एका प्लास्टिकच्या गोणीत ठेवलेले आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकलेले एक नवजात बाळ गुरुवारी दुपारी सुमारे १२ वाजता आढळून आले. एका नागरिकाने त्या भागातून जाताना बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून तपास केला असता हा धक्कादायक प्रकार उघड झाला.
सदर व्यक्ती लघुशंकेसाठी पुलाखाली गेला असताना त्याला रडण्याचा आवाज ऐकू आला. सतर्कतेने त्याने परिसरात शोध घेतला असता त्याला एका प्लास्टिकच्या गोणीतून आवाज येताना जाणवला. तो गोणी उघडताच त्याला चिमुकली बालिका दिसून आली. त्या क्षणी त्याने तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात याची माहिती दिली.
पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बाळाला तातडीने ताब्यात घेतले आणि वसई-विरार महानगरपालिकेच्या बोळींज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांच्या प्राथमिक तपासणीनुसार ही बालिका अंदाजे एक ते दीड महिन्यांची आहे. तिची प्रकृती सध्या स्थिर असून उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. एक निष्पाप बालिकेला असे कचऱ्यात टाकून देणे ही केवळ अमानुषता नसून गुन्हा देखील आहे, असा सूर समाजमाध्यमांवर उमटताना दिसतो आहे.
अर्नाळा पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. विशेषतः ही बालिका कोणाची आहे, तिला तिथे कोण आणि का टाकून गेले, याचा शोध लावण्यासाठी परिसरातील CCTV फुटेज तपासले जात आहेत. बाळाची प्रकृती पाहता तिची काही काळ देखभाल झाली असल्याचे प्राथमिक निरीक्षणातून लक्षात येत आहे.
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार हे कृत्य बालिकेच्या जन्मानंतर काही कारणास्तव समाज किंवा कुटुंबाच्या दबावाखाली करण्यात आले असावे, अशी शक्यता आहे. तरीही पोलिसांनी अधिकृत खुलासा केलेला नाही. संबंधित व्यक्तींना लवकरच शोधून त्यांच्यावर बालक कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.