Vinesh Phogat Become Mother: विनेश फोगाटच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन
Vinesh Phogat Become Mother
कुस्तीपटू आणि काँग्रेस आमदार विनेश फोगाटने दिल्लीतील रुग्णालयात एका गोंडस बाळाला जन्म दिला. आई आणि बाळ दोघेही सुखरूप. देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव.
सायली मेमाणे
पुणे १ जुलै २०२५ : भारतातील आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि हरियाणातील जुलाना विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस आमदार असलेल्या विनेश फोगाटच्या घरी १ जुलै रोजी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. दिल्लीतल्या अपोलो रुग्णालयात तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून, आई आणि बाळ दोघेही पूर्णपणे स्वस्थ आहेत. या आनंदाच्या बातमीने कुटुंबीय, क्रीडाविश्व आणि काँग्रेस पक्षात आनंदाचे वातावरण आहे. देशभरातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
विनेशने १३ डिसेंबर २०१८ रोजी कुस्तीपटू सोमवीर राठीशी पारंपरिक पद्धतीने विवाह केला होता. हा विवाह तिच्या मूळगावी हरियाणातील चरखी दादरी येथे झाला होता. लग्नानंतरही विनेशने आपली कुस्ती कारकीर्द सुरु ठेवली आणि देशासाठी विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकं मिळवली.
तिच्या आयुष्यातील या नव्या पर्वाबद्दल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि खासदार कुमारी शैलजा यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत तिचे अभिनंदन केले. “जुलाना येथील काँग्रेस आमदार श्रीमती विनेश फोगट जी यांना मुलाच्या जन्माबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. मी देवाला प्रार्थना करते की नवजात बाळ कुटुंबात आनंद आणि मंगल घेऊन येवो आणि तुम्ही दोघेही निरोगी आणि आनंदी राहा,” असे त्यांनी लिहिले.
गेल्या वर्षी विनेश फोगाटला केवळ १०० ग्रॅम जास्त वजनामुळे २०२४ पॅरिस ऑलिंपिकच्या पात्रता फेरीतून बाहेर पडावे लागले होते. या अनुभवानंतर तिने खेळातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आणि राजकारणात प्रवेश करत काँग्रेसमध्ये सामील झाली. जुलाना मतदारसंघातून निवडणूक लढवून ती विजयी ठरली.
आता ती तिच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाच्या भूमिकांपैकी एक भूमिका निभावत आहे – आईची. विनेशचा हा नवा प्रवास तिच्या चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.