WWE ची क्वीन चार्लोट फ्लेअर ठरली सर्वाधिक ट्रोल होणारी महिला रेसलर; टॉप 5 यादी आली समोर

WWE ची ही स्पर्धक सोशल मिडीयावर ट्रोल होणारी क्वीन!
सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रोल होणाऱ्या WWE महिला स्टार्समध्ये चार्लोट फ्लेअरचा पहिला क्रमांक; १३ जुलै रोजी होणाऱ्या इव्होल्यूशन २०२५ स्पर्धेत तिची मोठी एंट्री.
सायली मेमाणे
पुणे ११ जुलै २०२५ : WWE म्हणजेच वर्ल्ड रेसलिंग एंटरटेन्मेंट ही जगभरातील सर्वात लोकप्रिय कुस्ती स्पर्धांपैकी एक आहे. भारतातही WWE ची क्रेझ प्रचंड आहे. त्यातही महिलांच्या कुस्ती विभागात “द क्वीन” म्हणून ओळखली जाणारी चार्लोट फ्लेअर हे एक अत्यंत चर्चित आणि यशस्वी नाव आहे. मात्र, तिच्या कौशल्यापेक्षा अनेकदा ती ट्रोल होण्यामध्येच अधिक चर्चेत असते. आता नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनानुसार, चार्लोट फ्लेअर ही सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रोल होणारी महिला कुस्तीपटू ठरली आहे.
फ्लेअरने आपल्या कारकिर्दीत WWE मध्ये मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं आहे. तिच्या नावावर अनेक चॅम्पियनशिप्स आहेत, मात्र तिने बहुतेक वेळा नकारात्मक पात्रे साकारली असल्याने चाहत्यांकडून तिला कधीच विशेष प्रेम मिळालं नाही. अनेक फॅन्सना असं वाटतं की WWE कंपनी तिच्यावर जास्त भर देते, ज्यामुळे इतर स्पर्धकांना संधी मिळत नाही. याच भावनेतून सोशल मीडियावर तिला वारंवार ट्रोल केलं जातं.
क्रिप्टोमॅनिअक्स स्पोर्ट्सने सादर केलेल्या अहवालात असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, चार्लोट फ्लेअर ही सर्वाधिक ऑनलाइन छळ सहन करणारी स्टार आहे. या अहवालानुसार, तिला ३६.४ टक्के नकारात्मक सोशल मीडिया प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. यानंतर क्रमांक लागतो तिचीच सहकारी WWE स्टार निया जॅक्स हिचा, जिने ३५.३ टक्के नकारात्मकता झेलली आहे. या यादीतील टॉप-५ ट्रोल होणाऱ्या महिला स्टार्समध्ये AEW ची मर्सिडीज मोने (२९.६%), माजी AEW व WWE स्टार सराया (२९.३%) आणि टेगन नॉक्स (२८.६%) यांचाही समावेश आहे.
दरम्यान, WWE इव्होल्यूशन २०२५ या महिला प्रीमियम लाईव्ह इव्हेंटची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. हा महिला विभागातील एक महत्त्वाचा शो १३ जुलै रोजी होणार असून, चार्लोट फ्लेअर पुन्हा एकदा या स्पर्धेत अॅक्शनमध्ये दिसणार आहे. यावेळी महिला टॅग टीम चॅम्पियनशिपसाठी फॅटल ४ वे सामना होणार असून त्यामध्ये रॅकेल रॉड्रिग्ज आणि रोक्सेन पेरेझ, चार्लोट फ्लेअर आणि अलेक्सा ब्लिस, काबुकी वॉरियर्स आणि सोल रुका व झारिया या संघांमध्ये तीव्र स्पर्धा पाहायला मिळेल. चाहत्यांना विशेषतः फ्लेअर आणि ब्लिस यांना एकत्र पाहण्याची मोठी उत्सुकता आहे. त्यांच्या जोडीने या स्पर्धेत बाजी मारण्याची पूर्ण शक्यता आहे.
चार्लोट फ्लेअरबद्दल असलेला द्वेष हा काहीसा अतिरेकी वाटू शकतो, मात्र तिच्या प्रतिभेला नक्कीच कोणी नाकारू शकत नाही. सोशल मीडिया ट्रोलिंगच्या जगातही ती आपल्या खेळाने चाहत्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत राहते. इव्होल्यूशन २०२५ मध्ये ती कशी कामगिरी करते हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter