YouTuber Mahi Khan Controversy : मनसेच्या इशाऱ्यानंतर माही खानचा माफीनामा; मुग्धा मजुमदार प्रकरणात घेतली माघार

0
मनसेच्या इशाऱ्यानंतर माही खानचा माफीनामा; मुग्धा मजुमदार प्रकरणात घेतली माघार

मनसेच्या इशाऱ्यानंतर माही खानचा माफीनामा; मुग्धा मजुमदार प्रकरणात घेतली माघार


एअर इंडियाच्या विमानातील मराठी भाषेवरून झालेल्या वादानंतर युट्युबर माही खानने मनसेच्या इशाऱ्यानंतर अखेर माफी मागितली आहे. मुग्धा मजुमदार यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी माही खानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

सायली मेमाणे

पुणे २८ ऑक्टोबर २०२५ : YouTuber Mahi Khan Controversy : एअर इंडियाच्या विमानात मराठी भाषेवरून झालेल्या वादाचा शेवटी शेवट झाला आहे. मराठी बोलल्यामुळे एका महिलेवर अन्याय केल्याचा आरोप झाल्यानंतर, युट्युबर माही खानने अखेर सोशल मीडियावर सार्वजनिक माफी मागितली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिलेल्या कठोर इशाऱ्यानंतर अवघ्या 24 तासांत माही खानला माघार घ्यावी लागली.

हा संपूर्ण वाद विमानातील एका क्षुल्लक घटनेवरून सुरू झाला होता. मूळच्या बंगाली असलेल्या पण मराठी भाषेचा अभिमान बाळगणाऱ्या मुग्धा मजुमदार या महिला एअर इंडियाच्या विमानात प्रवास करत होत्या. त्यावेळी त्यांच्या पुढच्या सीटवर युट्युबर माही खान बसला होता. चहा पित असताना माही खानने अचानक सीट मागे घेतली, ज्यामुळे मजुमदार यांच्या अंगावर पुढ्यातील जेवण सांडले. त्यांनी शांतपणे “भाऊ, जरा हळू” असं मराठीत म्हटलं. मात्र एवढ्याशा वाक्यावरून माही खानने महिलेशी वाद सुरू केला आणि तो व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला.

त्या व्हिडिओमध्ये महिलेला मराठी बोलल्यामुळे लक्ष्य करण्यात आलं. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुग्धा मजुमदार यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. सोशल मीडियावर त्यांना धमक्या, शिवीगाळ, आणि अपमानास्पद संदेश पाठवले गेले. एवढंच नव्हे तर त्या ह्युंदाई कंपनीत कार्यरत होत्या आणि या वादानंतर त्यांना नोकरीही गमवावी लागली. या प्रकरणामुळे मराठी समाजात संतापाची लाट उसळली.

मुग्धा मजुमदार यांनी यानंतर मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची भेट घेतली आणि आपल्या व्यथेबद्दल सांगितले. त्यांनी माही खानविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणावर मनसेने कठोर भूमिका घेतली. अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “माही खान हा व्ह्यूज वाढवण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी असे व्हिडिओ बनवतो. पण मराठी माणसांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. त्याला शोधून काढून मनसे कार्यालयात आणून कोंबडा बनवू आणि त्याच्याकडून मराठी बोलवू,” असा इशारा त्यांनी दिला.

या इशाऱ्यानंतर अखेर माही खानने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून माफी मागितली. त्याने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलं की, “मी जो व्हिडिओ पोस्ट केला होता, तो मी काढून टाकला आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मी कोणत्याही भाषेविरोधात नाही. माझ्या व्हिडिओमुळे कुणाला दुखापत झाली असेल तर मी सर्वांची माफी मागतो. मी मुंबईला नेहमी येत-जात असतो, आणि जय महाराष्ट्र!”

या घटनेनंतर सोशल मीडियावर माही खानच्या माफीनाम्याची चर्चा जोरात सुरू आहे. मराठी नेटिझन्सनी मनसेच्या भूमिकेचं स्वागत केलं असून, मराठी भाषेचा अपमान करणाऱ्यांना इशारा दिला आहे. मुग्धा मजुमदार यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर समर्थन व्यक्त होत आहे.

ही घटना पुन्हा एकदा मराठी भाषेच्या स्वाभिमानाचा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेचा ठसा उमटवणारी ठरली आहे. माही खानचा माफीनामा म्हणजे सोशल मीडियावर झालेल्या चुकीच्या कृत्यांचा समाजाकडून होणारा निषेध याचं प्रतीक आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *