ZP शाळेचा चमत्कार! फक्त 3 विद्यार्थ्यांतून सुरूवात, आता जागतिक टॉप 10 शाळांमध्ये समावेश
ZP शाळेचा चमत्कार! फक्त 3 विद्यार्थ्यांतून सुरूवात, आता जागतिक टॉप 10 शाळांमध्ये समावेश
पुणे जिल्ह्यातील ZP शाळेचा जागतिक स्तरावरील प्रवास! फक्त 3 विद्यार्थ्यांपासून सुरुवात, आज जगातील टॉप 10 शाळांमध्ये स्थान.
सायली मेमाणे
पुणे १० जुलै २०२५ : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जालिंदरनगर या लहानशा गावात वसलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आज जागतिक पातळीवर देशाचे नाव उजळवते आहे. फक्त तीन विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आज 120 हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला असून ही ZP शाळा आता जगातील ‘Top 10 Schools in the World’ यादीमध्ये झळकली आहे. सरकारी शाळा म्हणजे मागासलेपणा, कमकुवत पायाभूत सुविधा आणि गुणवत्तेचा अभाव ही प्रतिमा मोडून टाकत, या शाळेने एक नवा इतिहास घडवला आहे.
या परिवर्तनामागे उभे आहेत शिक्षक दत्तात्रय वारे. राजकीय कारणांमुळे या शाळेत त्यांची बदली झाली होती. पण त्यांनी परिस्थितीला शरण न जाता ‘शाळा नव्हे तर समाज घडवायचा’ हा निर्धार केला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘विषय मित्र प्रणाली’ राबवली, जिथे मोठे विद्यार्थी छोट्यांना शिकवतात, मार्गदर्शन करतात. यामुळे शिकण्याची सवय, जबाबदारी आणि संवादकौशल्य यांचा उत्क्रांतीशील विकास घडतो.
या शाळेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जातो. स्मार्ट बोर्ड्स, संगणक प्रयोगशाळा, ई-लायब्ररी, रोबोटिक्स आणि कोडिंगसारखे आधुनिक विषय शिकवले जातात. इतकंच नव्हे, ही भारतातील एकमेव सरकारी शाळा आहे जिथे इंग्रजीबरोबरच जपानी भाषा शिकवली जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी, हस्तकला, विज्ञान प्रयोग, योगा आणि क्रीडा क्षेत्रातही प्रशिक्षण दिलं जातं.
शिक्षकांची कमतरता भरून काढण्यासाठी गावातील तज्ज्ञ पालक आणि नागरिक स्वतःहून शाळेत विविध विषय शिकवतात. इलेक्ट्रॉनिक्स, सुतारकाम, प्लंबिंग यासारख्या कौशल्यावर भर दिला जातो. शाळेची पुनर्बांधणी स्थानिकांच्या सहभागातून पार पडली, ज्यात त्यांनी शाळेला आपली शाळा म्हणून स्वीकारले. यामुळे ही शाळा ‘शाळा की फक्त विद्यार्थी घडवते’ नाही, तर एक संपूर्ण समाज उभा करते हे ठामपणे सिध्द झाले आहे.
या मॉडेल स्कूलचा आदर्श पाहून अनेक राज्य सरकारांनी त्याचा अभ्यास सुरू केला आहे. भारत सरकारकडून आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थांकडून गौरव करण्यात आला आहे. शिक्षण म्हणजे केवळ पाठांतर नसून, समावेश, नवाचार आणि आत्मनिर्भरतेचा प्रवास असतो, हे या शाळेने दाखवून दिले आहे.
आज जालिंदरनगरची जिल्हा परिषद शाळा केवळ एक शिक्षणसंस्था नाही, तर नवभारताच्या शैक्षणिक पुनर्रचनेचे प्रतीक ठरली आहे. वारे गुरुजींसारख्या शिक्षकांचा दृष्टिकोन, गावकऱ्यांचा सहभाग आणि मुलांचा उत्साह या साऱ्यांनी मिळून सरकारी शाळाही जागतिक यश मिळवू शकते हे सिद्ध केलं आहे.