अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन; शिवसेना नेते कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात मोठा निर्णय
अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन; शिवसेना नेते कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात मोठा निर्णय
१९ वर्षांनंतर अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी जेलमधून बाहेर येणार. शिवसेना नेते कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने वय आणि शिक्षा पूर्णत्वाचा आधार घेत जामीन मंजूर केला.
सायली मेमाणे
पुणे २९ ऑगस्ट २०२५ : अंडरवर्ल्ड डॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि ‘डॅडी’ नावाने प्रसिद्ध असलेल्या अरुण गवळीला अखेर १९ वर्षांनंतर जेलमधून सुटका मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने गवळीला जामीन मंजूर केला असून या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि गुन्हेगारी विश्वात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मुंबईतील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येच्या प्रकरणी गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती आणि तो नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता.
सर्वोच्च न्यायालयातील जस्टीस एम. एम. सुंदरेश आणि जस्टीस एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. गवळीने १७ वर्षे आणि तीन महिन्यांची शिक्षा पूर्ण केली असून सध्या त्याचे वय ७६ वर्षे आहे. या दोन प्रमुख बाबी लक्षात घेऊन न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र, गवळीने निचल्या न्यायालयाने ठरवलेल्या अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक असेल. या प्रकरणाची अंतिम सुनावणी फेब्रुवारी २०२६ मध्ये होणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येची घटना २ मार्च २००७ रोजी घडली होती. घाटकोपर येथील त्यांच्या घरी हल्लेखोरांनी घरात घुसून अंदाधुंद गोळीबार केला होता. तेव्हा जामसांडेकर टीव्ही पाहत होते आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासानंतर गवळी आणि त्याच्या गटातील ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. तर तिघांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले होते.
या हत्येच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत जामसांडेकर यांनी अरुण गवळी गटातील उमेदवार अजित राणे यांना केवळ ३६७ मतांनी पराभूत केले होते. या पराभवाच्या पार्श्वभूमीवरच हत्या घडवून आणल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती. मुंबईतील दगडी चाळीत वाढलेला अरुण गवळी हा १९८० आणि ९० च्या दशकात मुंबई अंडरवर्ल्डमधील एक महत्त्वाचे नाव मानला जात असे. त्याच्यावर खून, खंडणी, सुपारी हत्या यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.
विशेष म्हणजे, गवळीने राजकारणातही आपला ठसा उमटवला होता. तो २००४ ते २००९ दरम्यान आमदार म्हणून विधानसभेत निवडून आला होता. त्याच्या टोळीच्या प्रभावामुळे मध्य मुंबईतील काही भागांत गवळीचे वर्चस्व कायम राहिले होते. आता, मुंबई महापालिका निवडणुका जवळ येत असतानाच त्याला मिळालेला जामीन अनेकांच्या भुवया उंचावणारा आहे. याचा राजकीय समीकरणांवर काय परिणाम होईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अंडरवर्ल्डमधून राजकारणात प्रवेश करून पुन्हा तुरुंगातून बाहेर पडणाऱ्या गवळीच्या सुटकेने मुंबईच्या सामाजिक-राजकीय विश्वात खळबळ उडाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ‘डॅडी’ आता पुन्हा एकदा प्रकाशझोतात येणार यात शंका नाही.