आरोग्य विभागाच्या सेवा लवकरच ऑनलाईन; मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देश
आरोग्य विभागाच्या सेवा लवकरच ऑनलाईन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक आरोग्य सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करण्याचे आदेश दिले.
सायली मेमाणे
पुणे ११ जुलै २०२५ : राज्यातील आरोग्य सुविधा अधिक कार्यक्षम, सुलभ व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सहज पोहोचाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. या सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवर थेट नागरिकांसाठी उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
विधानभवन येथे घेण्यात आलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर तसेच मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, प्राथमिक आरोग्य सुविधा ग्रामीण भागात जितक्या महत्त्वाच्या आहेत, तितक्याच शहरी भागातही त्या सक्षम असाव्यात. त्यामुळे शहरांमध्येही प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने ५९८३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, तो टप्प्याटप्प्याने वितरित केला जाणार आहे. या निधीतून ३९८ प्राथमिक आरोग्य केंद्रे व २८०६ उपकेंद्रांचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. याशिवाय, नवीन रुग्णवाहिकांच्या खरेदीसाठी आवश्यक ती करार प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
आरोग्य यंत्रणेच्या मजबुतीसाठी केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य योजना प्रभावीपणे राबवाव्यात असेही निर्देश त्यांनी दिले. जिल्हा व उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये यांना आवश्यक सुविधा व यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, असे सांगताना त्यांनी सार्वजनिक आरोग्य यंत्रणेतील सर्वच सेवांचा डेटा ऑनलाईन उपलब्ध करण्याचे आदेश दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी औषध आणि वैद्यकीय उपकरणांची खरेदी पारदर्शक व सुलभ करण्यासाठी प्रणालीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरण्याचे निर्देशही दिले. आरोग्य क्षेत्रातील अधिकाऱ्यांचे कौशल्यविकास, जनजागृती व सेवा वितरणामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर देण्यात यावा, असेही त्यांनी नमूद केले.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना यांच्यांतर्गत येणाऱ्या रुग्णालयांचा सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध करून नागरिकांना एकाच ठिकाणी सुलभ सेवा देणे शक्य होईल. त्यामुळे आरोग्य विभागाच्या संकेतस्थळाचे अद्ययावतीकरण तातडीने करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.
या निर्देशांमुळे आरोग्य विभागाच्या सेवा डिजिटल माध्यमातून आणखी कार्यक्षम आणि पारदर्शक होणार असून, नागरिकांना झगडावे लागणार नाही. आरोग्य सेवांमध्ये डिजिटल युगाची पावले अधिक तीव्रतेने पडतील, अशी अपेक्षा आहे.