कमळी मालिकेचा वर्ल्ड रेकॉर्ड; विजया बाबरची जबरदस्त कामगिरी

0
अभिनेत्री विजया बाबरच्या दमदार सादरीकरणाची सर्वत्र चर्चा

अभिनेत्री विजया बाबरच्या दमदार सादरीकरणाची सर्वत्र चर्चा

कमळी मालिकेच्या शिवस्तुती प्रोमोची वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियात नोंद; अभिनेत्री विजया बाबरच्या दमदार सादरीकरणाची सर्वत्र चर्चा

सायली मेमाणे

पुणे १ जुलै २०२५ : ❝ मराठमोळ्या अभिनेत्रीची दमदार कामगिरी; वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियाला गवसणी ❞

झी मराठी वाहिनीवरील ‘कमळी’ ही नवी मालिका ३० जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली असून, मालिकेच्या पहिल्याच प्रोमोने सर्वत्र खळबळ उडवली आहे. या मालिकेची मुख्य भूमिका विजया बाबर साकारत असून, तिच्या अभिनयाने आणि कथानकाच्या वेगळेपणामुळे ‘कमळी’ने अल्पावधीतच सोशल मीडियावर जबरदस्त चर्चेची लाट निर्माण केली आहे.

‘कमळी’ ही मालिका एका अशा मुलीची कथा आहे जी शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यात परिवर्तन घडवू इच्छिते. लहान गावातून मुंबईसारख्या महानगरात येऊन तिला मोठ्या कॉलेजमध्ये शिकायचं आहे. तिचं स्वप्न आहे गावात मुलींसाठी महाविद्यालय सुरू करणं. अशा प्रेरणादायी कथानकामुळे ही मालिका वेगळी ठरते.

परंतु मालिकेच्या लोकप्रियतेमागे आणखी एक विशेष कारण आहे. ‘कमळी’च्या एका प्रोमोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्तुतीचे गायन करण्यात आले आणि या प्रोमोमधून विक्रमी कामगिरी घडली. ठाण्यातील सरस्वती मंदिर ट्रस्टच्या पटांगणात 3000 पेक्षा जास्त मुलामुलींनी एकत्र येत शिवस्तुती गायली. या अद्वितीय उपक्रमाची नोंद थेट वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया मध्ये झाली आहे.

हा ऐतिहासिक क्षण अधिक खास ठरला कारण यावेळी मालिकेतील अभिनेत्री विजया बाबर, केतकी कुलकर्णी आणि निखिल दामले हे कलाकारही उपस्थित होते. ‘कमळी’ मालिकेचा हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे मालिकेच्या टीमचे अभिनंदन होत आहे.

याआधीसुद्धा कमळीच्या टीमने सामाजिक उपक्रम राबवले आहेत. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाडमधील शाळेत जाऊन 100 मुलींना सायकलींचं वाटप करण्यात आलं. या मुली दररोज 8 ते 10 किलोमीटर अंतर कापून शाळेत जातात, त्यामुळे या सायकली त्यांच्यासाठी फार उपयोगी ठरल्या.

या मालिकेच्या माध्यमातून केवळ करमणूकच नव्हे तर सामाजिक जागरूकता आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे. ‘कमळी’ ही मालिका आता झी मराठी वाहिनीवर दररोज रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते आणि तिच्या प्रत्येक भागात एक सामाजिक संदेश दडलेला असतो.

अभिनेत्री विजया बाबरच्या सशक्त अभिनयाने ‘कमळी’ला अधिक वजन मिळाले असून, तिची ही कामगिरी सर्व मराठी रसिकांसाठी अभिमानास्पद आहे.

झी मराठीच्या या नव्या प्रवासाने, ‘कमळी’ मालिका केवळ मनोरंजनापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर समाजाला दिशा देणारी एक सशक्त माध्यम बनली आहे. वर्ल्ड रेकॉर्ड मिळवून ही मालिका आता राष्ट्रीय स्तरावरही चर्चेचा विषय ठरली आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed