कराड एआय अश्लील व्हिडिओ प्रकरण; डॉक्टरांवरील आरोपामुळे वैद्यकीय क्षेत्र हादरले
कराड एआय अश्लील व्हिडिओ प्रकरण
कराडमध्ये डॉक्टरांविरोधात एआय वापरून अश्लील व्हिडिओ तयार केल्याची घटना समोर, पोलिसांत गुन्हा दाखल; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
सायली मेमाणे
कराड १२ जून २०२५ : कराड एआय अश्लील व्हिडिओ प्रकरण हे प्रकरण सध्या संपूर्ण सातारा जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून बनावट अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एक डॉक्टर व त्याचा मित्र संशयित आरोपी असून, पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
घटनेनुसार, कराड शहरातील एका प्रसिद्ध थेरपी सेंटरविरोधात काही संघटनांनी तक्रारी केल्या होत्या. याअनुषंगाने आरोग्य विभागाने पाहणी केली आणि केंद्राविरोधात नकारात्मक अहवाल सादर केला. याच रागातून संबंधित डॉक्टर डॉ. राजेश शिंदे याने दोन महिला डॉक्टर, एक तरुणी व एका तरुणाचा AI चा वापर करून अश्लील व्हिडिओ तयार केल्याचा आरोप आहे.
या बनावट व्हिडिओसाठी शिंदे याने पंजाबमधील विकास शर्मा या व्यक्तीकडून मदत घेतल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. आरोपीने संबंधित व्यक्तींचे मोबाईल क्रमांक व व्हिडिओ शर्मा याला पाठवून खास व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यास सांगितले. या ग्रुपवरच हे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले.
पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे की, व्हिडिओ बनवण्यामागे उद्देश सूड घेणे आणि प्रतिमा मलिन करणे हाच होता. तक्रारदारांनी तात्काळ याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात संपर्क साधत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
या प्रकारामुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. AI सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा गैरवापर किती धोकादायक ठरू शकतो, हे या घटनेतून स्पष्ट होते. सायबर गुन्हेगारीतील ही नवी पद्धत थांबवण्यासाठी कठोर कायदेशीर उपाययोजना करण्याची मागणी आता होत आहे.