दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरात मध्यरात्री बुलडोझर कारवाई; दगडफेकीनंतर तणाव, पोलिसांचा लाठीचार्ज
दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरात मध्यरात्री बुलडोझर कारवाई; दगडफेकीनंतर तणाव, पोलिसांचा लाठीचार्ज
दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तुर्कमान गेट परिसरात अवैध बांधकामांवर मध्यरात्री बुलडोझर कारवाई करण्यात आली. दगडफेक, अश्रूधूर आणि मोठ्या पोलिस बंदोबस्तामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.
पुणे 0७ डिसेंबर २०२६ : नवी दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरात मध्यरात्री प्रशासनाने अवैध बांधकामांवर मोठी कारवाई करत बुलडोझर अॅक्शन राबवली. रामलीला मैदानाजवळ असलेल्या ‘फैझ-ए-इलाही’ मशिदीच्या परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, जमावाकडून दगडफेक झाल्याने पोलिसांना अश्रूधूर आणि लाठीचार्जचा वापर करावा लागला.

प्रशासनाने 7 जानेवारीच्या मध्यरात्री ही कारवाई सुरू केली. या मोहिमेसाठी 10 हून अधिक बुलडोझर, 70 डंपर आणि हजारहून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, तब्बल 9 जिल्ह्यांचे डीसीपी दर्जाचे अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित होते. याशिवाय 15 हून अधिक जेसीबी मशिदीलगतच्या अवैध बांधकामांवर कारवाईसाठी वापरण्यात आल्या. महापालिकेचे 150 पेक्षा अधिक कर्मचारी आणि मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने परिसर अक्षरशः छावणीत रूपांतरित झाला होता.
कारवाईदरम्यान मशिदीकडे जाणारे सर्व प्रमुख रस्ते बॅरिकेडिंग लावून बंद करण्यात आले होते. स्थानिक नागरिकांसह बाहेरून आलेल्या काही लोकांनी या कारवाईला तीव्र विरोध केला. जमावाने बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांवर दगडफेक सुरू केली. काही वेळातच परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या आणि गॅस बुलेट्सचा वापर करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. परिसरात स्फोटासारखे मोठे आवाज ऐकू येत होते, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
रॅपिड ॲक्शन फोर्सने (RAF) गल्लीबोळांमध्ये प्रवेश करून उपद्रवी घटकांना पांगवले. संपूर्ण परिसरावर ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने नजर ठेवण्यात येत होती. वरिष्ठ पोलिस अधिकारी परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून होते. संयुक्त पोलिस आयुक्त मधुर वर्मा यांनी सांगितले की, ही कारवाई पूर्णपणे न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. दगडफेक आणि हिंसाचारात सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे केली जाणार असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या कारवाईमागे दिल्ली उच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश आहे. डिसेंबर महिन्यात दिल्ली महानगरपालिकेने रामलीला मैदान परिसरातील अवैध अतिक्रमण आणि अनधिकृत व्यावसायिक वापर थांबवण्याचे निर्देश दिले होते. तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, सरकारी जमिनीचा वापर नकाशात नमूद नसलेल्या मोठ्या बांधकामासाठी केला जात होता. तसेच बारात घराचा वापर खाजगी कार्यक्रमांसाठी होत असल्याचेही समोर आले होते. न्यायालयाने मशिदीला लागून असलेले दवाखाना आणि बारात घर अवैध ठरवत ते हटवण्याचे आदेश दिले होते.
या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी करण्यात आलेल्या मध्यरात्रीच्या कारवाईमुळे तुर्कमान गेट परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information