नालासोपाऱ्यात व्हेल माशाची उलटी जप्त; 1.85 कोटींच्या तस्करीचा पर्दाफाश, दोघांना अटक

नालासोपाऱ्यात व्हेल माशाची उलटी जप्त; 1.85 कोटींच्या तस्करीचा पर्दाफाश, दोघांना अटक
नालासोपाऱ्यात तुळींज पोलिसांनी 1 कोटी 85 लाखांची व्हेल माशाची उलटी जप्त केली. समुद्रातील तरंगते सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पदार्थाच्या तस्करीप्रकरणी दोघांना अटक.
पुणे २० जानेवारी २०२५: नालासोपाऱ्यात तुळींज पोलिसांनी मोठी कारवाई करत प्रतिबंधित व्हेल माशाची उलटी जप्त केली असून, या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील तस्करीच्या जाळ्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सुमारे 1 कोटी 85 लाख 80 हजार रुपये किमतीची आणि 1 किलो 858 ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी पोलिसांनी हस्तगत केली आहे. या प्रकरणात दोन तस्करांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
तुळींज पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की, नालासोपाऱ्यातील 90 फिट रोड, प्रगतीनगर परिसरात प्रतिबंधित वस्तूची विक्री होणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचत परिसरात पाळत ठेवली. संशयास्पद हालचाली करणाऱ्या कादर गफार करगना याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडील बॅगेमध्ये तपकिरी रंगाचा, मेणासारखा दिसणारा पदार्थ आढळून आला.
पोलिसांनी या पदार्थाची सखोल चौकशी केली असता तो प्रतिबंधित व्हेल माशाची उलटी असल्याचे निष्पन्न झाले. वन्यजीव तज्ज्ञांकडून खात्री करून घेतल्यानंतर पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला. प्राथमिक तपासात या उलटीची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल 1.85 कोटी रुपये असल्याचे स्पष्ट झाले असून, यामुळे पोलिस यंत्रणाही चकित झाली आहे.
कादर गफार करगना याची कसून चौकशी केल्यानंतर या प्रकरणातील दुसरा आरोपी किशोर महादेव तपसाळे याचे नाव समोर आले. ही व्हेल माशाची उलटी किशोरनेच कादरला विक्रीसाठी दिल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी वेगाने हालचाली करत किशोर तपसाळेलाही अटक केली. सध्या दोघांकडून ही उलटी नेमकी कुठून आणण्यात आली, ती कोणाला विकली जाणार होती आणि यामागे कोणते मोठे तस्करीचे नेटवर्क कार्यरत आहे, याचा सखोल तपास सुरू आहे.
व्हेल माशाची उलटी ही ‘अँबरग्रीस’ या नावाने ओळखली जाते. याला ‘समुद्रातील तरंगते सोने’ असेही म्हटले जाते. हा पदार्थ व्हेल माशाच्या पचनसंस्थेत तयार होतो आणि समुद्रात तरंगत आढळतो. जगभरात याचा वापर अत्यंत महागड्या परफ्यूममध्ये सुगंध दीर्घकाळ टिकवण्यासाठी केला जातो. याशिवाय काही औषधांमध्येही या पदार्थाचा वापर होतो, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात याला प्रचंड मागणी आहे.
मात्र भारतात वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार व्हेल माशाची उलटी जप्त करणे, साठवणे, विक्री करणे किंवा तस्करी करणे हा गंभीर गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा आणि मोठ्या दंडाची तरतूद आहे. तरीही मोठ्या आर्थिक आमिषामुळे तस्कर अशा बेकायदेशीर व्यवहारांकडे वळत असल्याचे वारंवार समोर येत आहे.
या कारवाईमुळे नालासोपारा परिसरात मोठी खळबळ उडाली असून, तुळींज पोलिसांच्या या यशस्वी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिसांकडून आता या तस्करीमागील आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय संबंधांचा शोध घेतला जात असून, आणखी अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare