पुणे: केवळ २ तासांत खुनाचा उलगडा, मित्रच निघाला खुनी
अवघ्या २ तासांत आरोपीचा पर्दाफाश; नाट्यमय तपासात मित्रच निघाला खूनाचा दोषी
पुणे उंड्रीमध्ये लोखंडी पहाराने मित्राचा खून; पोलिसांनी २ तासांत गूढ उकलत आरोपीस अटक केली. आरोपीच पोलिसांना खोटी माहिती देत होता.
रिपोर्टर : झोहेब शेख
पुणे ४ ऑगस्ट २०२५ : पुणे – काळेपडळ पोलिसांनी केवळ दोन तासांत खून प्रकरणातील खळबळजनक गुन्ह्याचा उलगडा करत आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत. रविकुमार शिवशंकर यादव (वय ३३) याचा लोखंडी पहाराने डोक्यावर वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. विशेष म्हणजे या खुनाची माहिती पोलिस कंट्रोल रुमला स्वतः आरोपी किसन राजमंगल सहा (वय २०, रा. बिहार) यानेच ‘अन्य चौघांनी हल्ला केला’ असे खोटे सांगून दिली होती.
घटना दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ४.५२ वाजता उंड्रीतील साईगंगा सोसायटीसमोरील पत्र्याच्या शेडमध्ये घडली. किसन सहा याने पोलिसांना फोन करून सांगितले की चार अज्ञात इसमांनी त्यांच्या मित्रावर बेडसिट व गादी न दिल्याच्या कारणावरून हल्ला केला. मात्र पोलिसांनी घटनास्थळ गाठल्यानंतर मयत इसम रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. त्याला तत्काळ रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले.
मात्र प्राथमिक चौकशीतच पोलिसांना कॉल करणाऱ्या इसमाच्या कथेत अनेक विसंगती आढळल्या. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर कुठल्याही अनोळखी चार व्यक्तींच्या हालचाली आढळल्या नाहीत. शेजाऱ्यांकडून माहिती घेतल्यावर कॉल करणाऱ्या किसन सहा व मयत यादव यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण होत असल्याचे निष्पन्न झाले.
त्यामुळे पोलिसांनी किसन सहा याच्यावर पोलिसी खाक्या दाखविला असता, त्याने खुनाची कबुली दिली. यापूर्वी देखील मयत इसम त्याला वारंवार शिवीगाळ व मारहाण करीत असल्यामुळे रागाच्या भरात झोपलेल्या मित्राच्या डोक्यात लोखंडी पहार घालून त्याचा खून केल्याचे कबूल केले.
या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात IPC कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सपोनि रत्नदीप गायकवाड करीत आहेत.
ही चक्रावून टाकणारी कारवाई मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या तपासात सपोनि विलास सुतार, पो.नि. अमित शेटे, पोउनि अनिल निबाळकर, पो. अं. प्रविण काळभोर, प्रतीक लाहीगुडे, दाऊद सय्यद, किशोर पोटे, प्रविण कांबळे, परशुराम पिसे, शाहीद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, सद्दाम तांबोळी, अतुल पंधरकर, महादेव शिंदे, प्रदिप बेडीरकर, श्रीकृष्ण खोकले, नितीन शिंदे यांच्या विशेष पथकाने तात्काळ कारवाई केली.
ही घटना केवळ पोलीस दक्षतेचेच नव्हे, तर जवळच्या व्यक्तीवरही विश्वास ठेवताना किती सावधगिरी बाळगावी लागते, याचे भयावह उदाहरण ठरते.