पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी संपणार; 25 किमी लांबीचा सहा पदरी उड्डाणपूल उभारणार
पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी संपणार; 25 किमी लांबीचा सहा पदरी उड्डाणपूल उभारणार
हडपसर-उरळी कांचन दरम्यान सहा पदरी उड्डाणपूल; 5262 कोटी खर्च, वाहतूक कोंडी आणि अपघातांवर कायमचा तोडगा मिळणार
सायली मेमाणे
पुणे १० जुलै २०२५ : पुणे-सोलापूर महामार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हडपसर ते यवत दरम्यान सहा पदरी महामार्ग विकसित करण्यास मान्यता देण्यात आली असून, त्यात विशेषतः हडपसर ते उरळी कांचन दरम्यान तब्बल २५ किलोमीटर लांबीचा सहा पदरी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ५२६२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या मार्फत या कामाची अंमलबजावणी केली जाणार आहे. २० ऑगस्ट २०२५ पासून या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेस सुरुवात होणार आहे.
सध्या पुणे-सोलापूर महामार्गावर दररोज ५० हजाराहून अधिक वाहने धावत असून त्यामध्ये प्रवासी आणि मालवाहू वाहनांचा समावेश आहे. सोलापूर, हैदराबाद, बारामती भागातून पुण्यात येणाऱ्या वाहनांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे उरळी कांचनपासूनच वाहतूक कोंडी सुरू होते आणि हडपसरपर्यंत ही परिस्थिती गंभीर होते. अशा वेळी हा उड्डाणपूल ही वाहतुकीसाठी एक मोठी दिलासादायक योजना ठरणार आहे.
नवीन उड्डाणपूल हडपसरमधील रवीदर्शन सिग्नलपासून सुरू होईल आणि तो मांजरी, लोणी काळभोर, उरळी कांचन, भिवरी, केसनंद फाटा मार्गे यवतपर्यंत विस्तारेल. यामध्ये हडपसर ते यवतदरम्यानचा ३१.५ किलोमीटरचा रस्ता सहा पदरी केला जाणार आहे. यामुळे या परिसरातील दैनंदिन वाहतूक कोंडी ३० ते ४५ मिनिटांनी कमी होईल, तसेच अपघातांच्या संख्येतही लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. पीएमपीएल आणि एसटी महामंडळाच्या बसेसना वेळेवर सेवा पुरवता येईल. विशेषतः यवत, सासवड, बारामतीसारख्या ग्रामीण भागांतील प्रवाशांना वेळ आणि इंधनाची बचत होईल. परिणामी ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. उरळी कांचन, लोणी काळभोर, भिवरी, यवत अशा गावांचा पुण्याशी संपर्क अधिक सुलभ होईल.
या रस्त्याच्या उभारणीतून शहरी व ग्रामीण भागातील दळणवळण सुधारून एक प्रकारचा समतोल प्रस्थापित होईल. पायाभूत सुविधा उभारणीतून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी, वाहतुकीचा वेग आणि अपघातमुक्त प्रवास यामुळे पुणे परिसरातल्या नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय सकारात्मक बदल अपेक्षित आहे. यामुळेच या प्रकल्पाकडे फक्त रस्त्याच्या दृष्टीने नाही, तर सामाजिक, आर्थिक आणि वाहतुकीच्या दृष्टीनेही मोठा बदल करणारी योजना म्हणून पाहिले जात आहे.