पुण्यात एकनाथ शिंदेंची ‘जय गुजरात’ घोषणा; राजकीय वादाला सुरुवात
पुण्यात एकनाथ शिंदेंची ‘जय गुजरात’ घोषणा; राजकीय वादाला सुरुवात
पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ‘जय महाराष्ट्र’नंतर ‘जय गुजरात’ घोषणा दिल्यानं नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल.
सायली मेमाणे
पुणे ४ जुलै २०२५ : पुणे – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात एका सार्वजनिक कार्यक्रमात ‘जय महाराष्ट्र’नंतर ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिली असून त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कोंढवा परिसरात आयोजित एका सरकारी कार्यक्रमात हे वक्तव्य करण्यात आले. शिंदेंच्या या घोषणेनंतर कार्यक्रमातील अनेक पाहुणे आणि सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त करत तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सदर कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी मंचावरून भाषणाच्या शेवटी ‘जय हिंद’, ‘जय महाराष्ट्र’ आणि अचानक थांबून ‘जय गुजरात’ असे उच्चारले. या घटनाक्रमाचा व्हिडिओ काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे “महाराष्ट्रात गुजरातचं जयघोष का?” असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, हे विधान भाजपशी असलेल्या जवळिकेचं आणि गुजरातच्या नेतृत्वाप्रती असलेल्या निष्ठेचं प्रतिक असू शकते. काही विरोधकांनी या प्रकारावर टीका करत महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान झाल्याचा आरोप केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह अनेक नेत्यांनी शिंदेंच्या घोषणेला विरोध दर्शवला आहे.
शिंदे गटाकडून मात्र याला राजकीय रंग देण्याची गरज नाही, हे फक्त राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र ही घोषणा महाराष्ट्राच्या मातीत आणि मराठी अस्मितेच्या पृष्ठभूमीवर झाली असल्याने सामान्य नागरिकांमध्येही संतापाची भावना उमटताना दिसत आहे.
सत्तेत असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारवर याआधीही मराठी भाषेबाबतच्या धोरणांवरून टीका झाली आहे. त्यातच “जय गुजरात” या घोषणेमुळे महाराष्ट्रातील प्रादेशिक अस्मितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
हे प्रकरण केवळ राजकीय मर्यादेतच न राहता जनभावनेशी जोडले गेले आहे. त्यामुळे आगामी काळात यावरून आणखी आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.