पुण्यात काळू धबधब्यावर थरार! पर्यटक पाण्यात अडकला, स्कार्फ-ओढणीने जीव वाचवला

0
पुण्यात काळू धबधब्यावर थरार!

पुण्यात काळू धबधब्यावर थरार!

जुन्नरच्या काळू धबधब्यावर पर्यटक खोल पाण्यात अडकला; स्थानिक तरुणांनी स्कार्फ व ओढणी वापरून जीव वाचवला, प्रशासनावर सुरक्षा उपायांची मागणी.

सायली मेमाणे

पुणे १४ जुलै २०२४ : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध काळू धबधब्यावर शुक्रवारी (ता. ११ जुलै) एक धक्कादायक प्रसंग घडला. खिरेश्वर गावाच्या हद्दीत असलेल्या या धबधब्याच्या मुख्य प्रवाहात एक पर्यटक अडकला होता. काळू नदीचा हा धबधबा पाच टप्यांत खोल दरीत कोसळतो. यापैकी पहिल्या टप्प्यावर पर्यटकाचा पाय घसरल्याने तो थेट खोल दरीच्या कडेला जाऊन अडकला. अत्यंत वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात त्याचा जीव अडकल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

या प्रसंगानंतर देव तारी त्याला कोण मारी, ही मराठी म्हण खरी ठरली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या तरुणांनी प्रसंगावधान राखत त्याच्या मदतीस धाव घेतली. त्यांच्या जवळ कोणतीही दोरी उपलब्ध नव्हती. त्यामुळे त्यांनी स्कार्फ, ओढणी वापरून तातडीने दोरी तयार केली आणि ती त्या पर्यटकापर्यंत पोहोचवली. स्थानिक संतोष जाधव, उमेश रासकर, श्रीकांत आबाळे, संदीप गोरे, तुषार मेमाणे, संदीप साबळे आणि निलेश पाचपिंड यांनी मिळून त्या अडकलेल्या व्यक्तीचा जीव वाचवला.

तुषार मेमाणे यांनी सांगितले की, तो तरुण काळू नदी पार करत असताना त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला. पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन तो दरीच्या कडेला अडकला होता. त्याच्या सोबत कोणताही गाईड नव्हता, अशी माहितीही त्यांनी दिली. तर संतोष जाधव यांनी सांगितले की, हा तरुण काहीसा बेपर्वा होता आणि हुल्लडबाजी करताना पाण्यात पडला होता. वेदांत आबाळे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ओढणी व स्कार्फ वापरून दोरी तयार केली आणि त्या माध्यमातून हा धाडसी प्रयत्न करुन पर्यटकाचा जीव वाचवण्यात यश आले.

या घटनेनंतर मात्र स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यांच्या मते बेशिस्त पर्यटकांमुळे पर्यटन स्थळांची बदनामी होत आहे. नियम न पाळता खोल दरीच्या कडेला जाऊन फोटो, सेल्फी, रील्स काढणाऱ्या पर्यटकांमुळे अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. याच काळू धबधब्यावर यापूर्वीही अनेक जण पाण्यात पडून जखमी किंवा मृत्युमुखी पडले आहेत.

दैनिक सकाळने यापूर्वीच प्रशासनाला येथे रेलिंग लावण्याबाबत सूचना केली होती. मात्र अद्यापही ते दुर्लक्षितच असल्याने धोक्याची शक्यता वाढली आहे. पावसाळ्यात सुट्ट्यांमध्ये येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. त्यामुळे प्रशासनाने येथे सुरक्षारक्षक किंवा बचाव पथक तैनात करणे गरजेचे आहे.

पर्यटकांनीही अशा ठिकाणी पर्यटन करताना जबाबदारीने वागण्याची गरज आहे. सोशल मीडियासाठी जिवाशी खेळू नये, हे ही समजून घेणं आवश्यक आहे. स्थानिकांच्या मदतीमुळे जरी या वेळी एक जीव वाचला असला, तरी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitte

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed