बनावट महिला उभी करून १० एकर जमीन बळकावण्याचा कट उघड

0
बनावट महिला उभी करून १० एकर जमीन बळकावण्याचा कट उघड

बनावट महिला उभी करून १० एकर जमीन बळकावण्याचा कट उघड

पुण्यात वाघोली येथे १० एकर जमीन बनावट कागदपत्रांद्वारे हडपण्याचा प्रकार उघड. माजी पोलिस निरीक्षकासह चौघांविरोधात गुन्हा दाखल. बनावट आधार-पॅन वापरून खरेदीखत नोंद.

सायली मेमाणे,

पुणे १७ मे २०२५ — वाघोली भागात तब्बल १० एकर जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात एक महिला बनावट मालकीण म्हणून उभी करण्यात आली असून, चंदननगर पोलिस ठाण्याचे माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांचाही सहभाग असल्याचा संशय आहे.

गुन्हा २०२२ ते १७ मे २०२३ या कालावधीत घडला. या प्रकरणात पोलिस निरीक्षक (गुन्हे) स्वाती खेडकर यांनी फिर्याद दिल्यानंतर चंदननगर पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये आनंद लालासाहेब भगत (चिंतामणी पार्क, वाडेगाव), शैलेश सदाशिव ठोंबरे (हडपसर), माजी निरीक्षक राजेंद्र लांडगे आणि अपर्णा यशपाल वर्मा ऊर्फ अर्चना पटेकर (इस्लामपूर, सांगली) यांचा समावेश आहे.

पोलिस तपासानुसार, या टोळीने संगनमत करून अर्चना पटेकर हिला ‘अपर्णा वर्मा’ या खोट्या नावाने सादर केले. तिच्या नावाने बनावट आधार कार्ड व पॅन कार्ड तयार करून खरेदीखताची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. हे खरेदीखत हवेलीतील दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवले गेले. पोलिस तपासात हे सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकरणाचा सखोल तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed