बाणेर-बालेवाडी वीज समस्यांवर चंद्रकांत पाटील आक्रमक महावितरणला दिल्या तातडीच्या सूचना

बाणेर-बालेवाडी वीज समस्यांवर चंद्रकांत पाटील आक्रमक महावितरणला दिल्या तातडीच्या सूचना
बाणेर-बालेवाडीतील वारंवार वीज खंडित होण्यावर चंद्रकांत पाटील आक्रमक झाले. महावितरणच्या अधिकाऱ्यांना नवीन उपकेंद्र, फीडर आणि विद्यमान यंत्रणा सक्षमीकरणाचे निर्देश दिले.
पुणे २३ मे २०२६ : पुण्याच्या बाणेर-बालेवाडी परिसरातील वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्यांमुळे नागरिकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड येथील निवासस्थानी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत समस्या तातडीने सोडवण्यासाठी स्पष्ट निर्देश दिले आहेत. नागरिकांना अखंडित व गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा मिळावा, यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करावे, असे पाटील यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
बैठकीत बाणेर-बालेवाडी परिसरातील वीजपुरवठा खंडित होण्यामागील कारणांचा सविस्तर आढावा घेतला गेला. या भागातील रस्ता रुंदीकरण आणि मेट्रो प्रकल्पाची कामे यामुळे अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तुटण्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर, जोडणीच्या ठिकाणी केबल नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम होत आहे.
नवीन निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प उभारण्यामुळे या परिसरातील विद्युत भार सातत्याने वाढत आहे, परंतु विद्यमान यंत्रणा पुरेशी नाहीत, असे अधिकाऱ्यांनी पाटील यांना सांगितले. या कारणास्तव बाणेर-बालेवाडी, पाषाण, सूस आदी भागातील वीज वितरण यंत्रणांचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्याचे निर्देश पाटील यांनी दिले.
भविष्यातील मागणी लक्षात घेऊन नवीन अतिउच्चदाब उपकेंद्र उभारण्याचा प्रस्ताव प्रलंबित असून, त्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घेऊन कामाला गती देण्याचे निर्देश पाटील यांनी दिले. दरम्यान, नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी NCL अतिउच्चदाब केंद्रातून दोन नवीन फीडर सुरू करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. येत्या सहा महिन्यांत ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले की, या कामांमध्ये कोणत्याही स्तरावर अडथळे निर्माण झाल्यास मंत्रालय किंवा महावितरण मुख्यालय स्तरावर स्वतंत्र बैठका घेऊन प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील. विशेषतः अत्यावश्यक वीज दुरुस्तीच्या कामांसाठी रस्ते खोदाई परवानग्यांमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत पुणे महापालिका आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन या समस्यांचे निराकरण केले जाईल.
तसेच, बाणेर-बालेवाडी परिसरातील वीजपुरवठ्याचा नियमित आढावा घेण्यासाठी दरमहा बैठक घेण्याचा निर्णयही घेण्यात आला. नागरिकांना अखंडित व गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा मिळावा, यासाठी प्रशासनाने तत्परतेने आणि जबाबदारीने काम करावे, अशा स्पष्ट सूचना चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare