भिगवण येथील 26 वर्षीय शुभम जाधव बेपत्ता; कुटुंबीय चिंतेत, पोलिसांचा शोध सुरू
भिगवण येथील 26 वर्षीय शुभम जाधव बेपत्ता; कुटुंबीय चिंतेत, पोलिसांचा शोध सुरू
भिगवण (इंदापूर, पुणे) येथील 26 वर्षीय शुभम दिपक जाधव दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली असून नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन.
सायली मेमाणे
पुणे २९ ऑगस्ट २०२५ : भिगवण (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे 26 वर्षीय शुभम दिपक जाधव (रा. भिगवण) मागील दोन दिवसांपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे जाधव कुटुंबीयांसह परिसरात मोठी चिंता निर्माण झाली आहे.
सविस्तर माहिती अशी की, मंगळवारी (दि. 26 ऑगस्ट) दुपारी सुमारे 1.45 वाजता शुभम घरातून बाहेर पडला आणि त्यानंतर तो परत आलेला नाही. घरातून निघताना त्याने चॉकलेटी रंगाचा उभ्या पांढऱ्या पट्ट्यांचा टी-शर्ट, निळ्या रंगाची जीन्स आणि काळ्या रंगाच्या चप्पला घातल्या होत्या. शुभम सोबत हिरो कंपनीची सीडी डिलक्स मोटारसायकल (MH 42 AV 1424) घेऊन गेला आहे.
शुभम जाधव याचा रंग गोरा, बांधा मजबूत, उंची अंदाजे 5 फूट 11 इंच असून तो मराठी व हिंदी भाषा बोलतो. दोन दिवस उलटूनही त्याचा ठावठिकाणा न लागल्याने कुटुंबीयांनी भिगवण पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार शुभमचा चुलत भाऊ प्रसाद जयंत जाधव (वय 29, रा. भिगवण) यांनी दिली आहे.
भिगवण पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली आहे. प्रभारी अधिकारी स.पो.नि. महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. महेश उगले तपास करत आहेत. नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, शुभमबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास तातडीने भिगवण पोलिस ठाण्याशी किंवा +919767672222 (पो. हवा महेश उगले) या क्रमांकावर संपर्क साधावा.
या घटनेमुळे भिगवण परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चेला उधाण आले असून, कुटुंबीय आपल्या प्रियजनाच्या सुरक्षित परतीसाठी व्याकुळ झाले आहेत.