मुंबई-गोवा महामार्ग: खड्ड्यांमुळे 4,500 मृत्यू, 10,000 जखमी – कोकणवासीयांचा सरकारला ‘कृती करा’ इशारा
मुंबई-गोवा महामार्ग: खड्ड्यांमुळे 4,500 मृत्यू, 10,000 जखमी – कोकणवासीयांचा सरकारला ‘कृती करा’ इशारा
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे 4,500 हून अधिक मृत्यू, 10,000 जखमी. वारंवार दिलेल्या डेडलाईन्स अपयशी. कोकणवासीयांची ठाम मागणी – आश्वासन नव्हे, कृती हवी.
सायली मेमाणे
पुणे ११ ऑगस्ट २०२५ : मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण काम आणि खड्ड्यांमुळे कोकणवासीयांच्या जीवावर बेतणारी दुर्घटना अखंड सुरूच आहे. आतापर्यंत 4,500 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 10,000 पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. अनेक डेडलाईन्स – 2016, 2018, 2020, 2023 आणि जून 2025 – जाहीर झाल्या, पण प्रत्यक्षात महामार्ग अजूनही धुळीने भरलेला, खड्ड्यांनी वेढलेला आणि अपघातांनी रक्तरंजित आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी नुकत्याच केलेल्या पाहणीत डिसेंबर 2025 पर्यंत काम पूर्ण होईल असे सांगितले. मात्र कोकणवासीयांचा सरकारवरील विश्वास संपला आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या आधी फोटोसेशन आणि गोड बोलांची परंपरा सुरू होते, पण उर्वरित काळात प्रवाशांना खड्ड्यांतून, अपघातांतून, वाहतूक कोंडीतून आणि उपचारांच्या अभावातून प्रवास करावा लागतो.
कोकणवासीयांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत – प्रत्येक टप्प्याचे वेळापत्रक जाहीर करून त्याचे काटेकोर पालन करावे, जबाबदार ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, मासिक प्रगती अहवाल प्रसिद्ध करावा, मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी आणि गणेशोत्सवापूर्वी प्राथमिक टप्पे युद्धपातळीवर पूर्ण करावेत. युवा सामाजिक कार्यकर्ते अक्षय महापदी यांनी स्पष्ट सांगितले – “आश्वासनं नकोत, कृती हवी. फोटो नकोत, खड्डेविरहित प्रवास हवा.”
सरकार गप्प का? किरकोळ घटनांवर तातडीची बैठक घेणारे सरकार, हजारो मृत्यूंवर मौन का बाळगते, असा थेट सवाल जनतेकडून उपस्थित केला जात आहे. कोकणातील अनेक नागरिकांनी या वर्षी महामार्गावरच गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, जो सरकारला जाहीर इशारा मानला जात आहे.