मुंबई पाण्याखाली बुडणार? शहराची जमीन वेगाने खचतेय; धक्कादायक वैज्ञानिक अहवाल
मुंबई पाण्याखाली बुडणार? शहराची जमीन वेगाने खचतेय; धक्कादायक वैज्ञानिक अहवाल
मुंबईसह दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि बंगळुरू या शहरांची जमीन वेगाने खचत असल्याचा नेचर सस्टेनेबिलिटीच्या अहवालात खुलासा झाला आहे. मुंबईत दरवर्षी 26.1 मिमीपर्यंत जमीन खचत असून सुमारे 19 लाख लोक उच्च जोखमीच्या भागात राहतात.
सायली मेमाणे
१२ नोव्हेंबर २०२५ : मुंबई – भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणारी मुंबई शहर आता खचत चाललं आहे, असा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. आंतरराष्ट्रीय विज्ञान नियतकालिक ‘नेचर सस्टेनेबिलिटी’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या नव्या अहवालानुसार, केवळ मुंबईच नाही तर दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि बंगळुरू या सर्व महानगरांतील जमीनही जलदगतीने खाली बसत आहे.
या अभ्यासानुसार, 2015 ते 2023 दरम्यान युरोपीयन उपग्रह सेंटिनेल-1 कडून मिळालेल्या आकडेवारीवरून असे स्पष्ट झाले आहे की, या शहरांतील 878 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ दरवर्षी काही मिलीमीटरने खाली जात आहे. मुंबईत जमीन दरवर्षी सरासरी 26.1 मिलीमीटर, तर दिल्लीमध्ये तब्बल 51 मिलीमीटर वेगाने खचत असल्याचे या संशोधनात उघड झाले आहे.
शहरांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेला ताण, भूजलाचा अत्याधिक वापर, अनियंत्रित बांधकामं आणि अस्थिर शहरी जलव्यवस्थापन ही या स्थितीमागील प्रमुख कारणे मानली जात आहेत. भूगर्भशास्त्रज्ञ प्रा. योगेश दूधपचारे यांनी सांगितलं की, “मुंबईतील अनेक भागात जमिनीचा खच जाणवण्याइतका गंभीर झाला आहे. इमारतींच्या पायाभरणीमध्ये झुकाव आणि भेगा दिसत आहेत, हा त्याचाच परिणाम आहे.”
उपग्रहावरून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील सुमारे 19 लाख लोक अशा भागात राहतात जिथे जमीन दरवर्षी 4 मिलीमीटरपेक्षा जास्त वेगाने खाली जात आहे. या प्रक्रियेचा परिणाम दीर्घकालीन असून, ती डोळ्यांना दिसत नाही. मात्र, त्याचे परिणाम भीषण आहेत — इमारतींच्या रचना कमकुवत होणे, जलवाहिन्यांमध्ये गळती वाढणे आणि पायाभरणी अस्थिर होणे यामुळे भविष्यात मोठे नुकसान होऊ शकते.
भूजलाचा अमर्याद उपसा हा जमिनीच्या खचण्यामागील मुख्य घटक मानला जात आहे. शहरांमधील भूजलाचा साठा 2002 ते 2023 या काळात मोठ्या प्रमाणात घटला आहे. जमिनीखालून पाणी काढल्याने मातीच्या वरच्या थरांमध्ये कोरडेपणा निर्माण होतो आणि ते हळूहळू आकुंचन पावतात. या घटनेला वैज्ञानिक भाषेत ‘लँड सबसिडन्स’ (Land Subsidence) म्हणतात.
याशिवाय, अनियमित पावसाचे चक्र, काँक्रीटीकरण आणि वाढलेला शहरी ताण यामुळे नैसर्गिक जलवाहिन्यांचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. परिणामी, पावसाचे पाणी जमिनीत शोषले न जाता निचऱ्याच्या अभावामुळे पृष्ठभागावर साचते आणि भूजल पुनर्भरण कमी होते. या सर्व घटकांमुळे जमीन अधिक वेगाने खचत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
जगभरात मुंबईसारखीच समस्या अनेक महानगरांना भेडसावत आहे. त्यात इंडोनेशियाची राजधानी जकार्ता हे सर्वात मोठं उदाहरण आहे. गेल्या 25 वर्षांत जकार्ता सुमारे 16 फूट खाली बुडलं असून, 2050 पर्यंत त्याचे काही भाग पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर न्यूयॉर्क, मेक्सिको सिटी आणि ढाका या शहरांनाही समान धोका आहे.
मुंबईत सध्या अनेक किनारी भाग — विशेषतः वरळी, माहिम, बांद्रा आणि कुर्ला परिसर — भूजल कमी झाल्याने आणि समुद्राच्या पातळीत वाढ झाल्याने उच्च जोखमीच्या क्षेत्रात मोडतात. भविष्यात समुद्राच्या पाण्याची पातळी आणखी वाढल्यास हे भाग थेट पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
पर्यावरणतज्ज्ञांच्या मते, ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने भूजल पुनर्भरण, पर्जन्यजल संकलन, बांधकाम नियोजनातील पारदर्शकता आणि निसर्गाशी सुसंगत विकास मॉडेल स्वीकारणं गरजेचं आहे.
मानवाने निसर्गाशी ताळमेळ साधला नाही, तर हा इशारा भविष्यातील विनाशाची सुरुवात ठरू शकतो. मुंबईसारख्या शहरांच्या अस्तित्वासाठी आता त्वरित आणि ठोस पावले उचलण्याची वेळ आली आहे.