मुंबईत कोट्यवधींच्या संपत्तीचा कलंकित वारसा; धनाढ्य बापाचा लेक आईला रस्त्यावर आणतो
मुंबईत कोट्यवधींच्या संपत्तीचा कलंकित वारसा
मुंबईत मुलाने वृद्ध आईला संपत्तीवरून त्रास देत फ्लॅट विकले, खार पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा नोंदवला.
सायली मेमाणे
मुंबई १७ जून २०२५ : मुंबईत आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडिलांनी प्रचंड कष्टाने उभ्या केलेल्या व्यवसायातून कमावलेली संपत्ती मुलाने अक्षरशः उधळून लावली आणि वृद्ध आईला रस्त्यावर आणले. खारच्या जुहूतारा रोड परिसरात राहणाऱ्या ७३ वर्षीय वृद्ध महिला आफरीन (नाव बदलले आहे) यांच्याशी त्यांच्या मुलाने आर्थिक आणि शारीरिक छळ करत अखेर दोन फ्लॅट विक्री करून त्या कोट्यवधी रुपयांवर कब्जा मिळवला. पोलिसांनी याप्रकरणी मुलाविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले असून ज्येष्ठ नागरिक संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई सुरू आहे.
या प्रकरणामागची कहाणी तितकीच हृदयद्रावक आहे. आफरीन यांचे पती चित्रपटसृष्टीतील जुनी व पुरातन वस्तू भाड्याने देण्याचा व्यवसाय करत होते. त्यांनी आपल्या मेहनतीने दोन फ्लॅट व ७५०० चौरस फुटांचे एक मोठे गोदाम खरेदी करून संपत्ती उभी केली. २०२१ मध्ये पतीचे निधन झाल्यानंतर आफरीन यांनी स्वतः हा व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली. पण याच काळात त्यांचा मुलगा, जो आधीपासूनच दारूच्या व्यसनात बुडालेला होता, सतत पैशांची मागणी करू लागला. पाच लाख, दोन लाख असे रकमेच्या मागण्यांमुळे त्यांचे आयुष्य त्रस्त झाले.
पुढे जाऊन या मुलाने आईवर मानसिक दडपण टाकून, धमकी देऊन व मारहाण करत अखेर फ्लॅट विकण्यास भाग पाडले. विक्री व्यवहारासाठी जबरदस्तीने त्यांना नोंदणी कार्यालयात नेण्यात आले. दोन्ही फ्लॅट विकल्यानंतर मिळालेले कोट्यवधी रुपये मुलाने उधळून लावले. आता आफरीन या एका भाड्याच्या घरात दिवस काढत आहेत. या सगळ्या प्रकारानंतर त्यांनी खार पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी पालक व ज्येष्ठ नागरिक कल्याण कायद्यानुसार आणि अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे आणखी एक गंभीर बाब उघडकीस आली. आफरीन यांच्या पतीने साठवलेल्या पुरातन वस्तूंच्या गोदामाची विक्रीही मुलाने एक बिल्डरकडून आगाऊ पैसे घेऊन केली होती. मात्र वेळेत पोलिसांकडे तक्रार गेल्यामुळे ही विक्री थांबवता आली आणि मोठा आर्थिक नुकसान टळले.
ही घटना केवळ एका आईच्या वेदना नाही, तर वृद्ध पालकांच्या सुरक्षेची आणि कर्तव्यान्मधून पळणाऱ्या मुलांच्या वर्तनाची गंभीर नोंद आहे. संपत्तीवर डोळा ठेवून केलेली ही प्रतारणा समाजात वृद्धांविषयी असलेल्या असंवेदनशीलतेचे भीषण चित्र दाखवते. मुलाच्या गैरवर्तनामुळे वृद्ध आईला न्यायासाठी पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजवावे लागणं हे दुर्दैवाचं आहे.
मुंबईसारख्या शहरात संपत्तीचा भार आणि माणुसकीचा अभाव एकत्र दिसला की, समाज म्हणून आपली जबाबदारी अधोरेखित होते. ही घटना केवळ कायद्याची बाब नाही, तर प्रत्येकासाठी एक नैतिक चेतावणी आहे की, वृद्ध पालक हे केवळ जबाबदारी नव्हे तर आपली माणुसकीची खरी परीक्षा असतात.
Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz
1 thought on “मुंबईत कोट्यवधींच्या संपत्तीचा कलंकित वारसा; धनाढ्य बापाचा लेक आईला रस्त्यावर आणतो”