मुंबईतील वंचित वस्त्यांत ‘आरोग्यसंपन्न’ उपक्रमाचा प्रभाव बालकुपोषणात ८५% घट
मुंबईतील वंचित वस्त्यांत ‘आरोग्यसंपन्न’ उपक्रमाचा प्रभाव बालकुपोषणात ८५% घट
टाटा मोटर्स फाऊंडेशनच्या ‘आरोग्यसंपन्न’ उपक्रमामुळे चेंबूर व वाशीनाका परिसरात बालकुपोषणात ८५% घट. माता-बाल आरोग्य, समुपदेशन, लसीकरण आणि समुदाय-केंद्रित मॉडेलमुळे हजारो कुटुंबांना लाभ.
पुणे 08 एप्रिल २०२६ : मुंबई महानगर क्षेत्रातील वंचित वस्त्यांमध्ये बालकुपोषण ही दीर्घकाळापासूनची गंभीर समस्या राहिली आहे. स्थलांतरित लोकसंख्या, अनिश्चित उत्पन्न, मर्यादित सार्वजनिक आरोग्य सेवा आणि पोषणाविषयी कमी जागरूकता या घटकांमुळे माता व बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसतो. या पार्श्वभूमीवर टाटा मोटर्स फाऊंडेशनने राबवलेला ‘आरोग्यसंपन्न’ उपक्रम आशेचा किरण ठरला आहे. या उपक्रमामुळे चेंबूर आणि वाशीनाका परिसरात गंभीर व मध्यम बालकुपोषणात तब्बल ८५ टक्क्यांची घट नोंदवली गेली असून १,००० हून अधिक बालकांच्या आरोग्यात सकारात्मक बदल दिसून आला आहे.
‘आरोग्यसंपन्न’ हा उपक्रम निर्मया फाउंडेशनच्या सहयोगाने विकसित करण्यात आला आहे. २०२१ पासून हा प्रकल्प प्रामुख्याने स्थलांतरित आणि वंचित समुदायांमध्ये राबवला जात असून, आतापर्यंत एक लाखांहून अधिक घरांपर्यंत पोहोचला आहे. ज्या भागांमध्ये लोकांचे उत्पन्न अनिश्चित आहे आणि आरोग्य सुविधा मर्यादित आहेत, अशा वस्त्यांमध्ये हा उपक्रम माता व बाल आरोग्याचा मजबूत आधार बनला आहे.
दाट लोकवस्तीच्या परिसरात नवजात बाळे, तान्ही मुले, गरोदर आणि नवमाता यांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. जागरूकतेच्या अभावामुळे अनियमित स्तनपान, नवजात बालकांना साखरेचे पाणी देणे यांसारख्या असुरक्षित पद्धती आढळतात. या सवयी कुपोषणाला खतपाणी घालतात. ‘आरोग्यसंपन्न’ उपक्रमाने या समस्येवर प्रतिबंधात्मक आणि समुदाय-केंद्रित दृष्टिकोन स्वीकारला आहे. पालकांसाठी वैयक्तिक समुपदेशन, गट सत्रे, पोषणाविषयी मार्गदर्शन आणि प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात काळजी यावर विशेष भर दिला जातो.
या प्रकल्पांतर्गत बालकांसाठी ओपीडी सेवा, समुदाय आरोग्य ग्रंथालये आणि सरकारी आरोग्य यंत्रणांशी सक्रिय समन्वय साधला जातो. शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. गरोदर महिलांना सरकारी आरोग्य व पोषण योजनांमध्ये नावनोंदणी करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते, तर अपूर्ण लसीकरण असलेल्या बालकांना लसीकरणासाठी संदर्भित केले जाते.
यावर्षी या उपक्रमाने आरोग्य शिबिरे, पोषण व वर्तणूक बदल कार्यक्रमांच्या माध्यमातून सुमारे १०,००० समुदाय सदस्यांपर्यंत पोहोच साधली आहे. ‘पीअर ग्रुप डेव्हलपमेंट’ मॉडेलद्वारे समुदायातील प्रमुखांना प्रशिक्षित केले जाते, ज्यामुळे जागरूकता वाढते आणि समाजात स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घेण्याची भावना निर्माण होते. हा दृष्टिकोन दीर्घकालीन शाश्वततेसाठी महत्त्वाचा ठरतो.
या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत विनोद कुलकर्णी, सीईओ, टाटा मोटर्स फाऊंडेशन म्हणाले की, शहरी वस्त्यांमधील लोकांना पोषण, आरोग्य सेवा आणि जागरूकतेच्या अभावासारख्या परस्पर संबंधित आव्हानांचा सामना करावा लागतो. स्थानिक समुदायावर आधारित, सातत्यपूर्ण आणि सरकारी यंत्रणांशी सहयोगाने राबवलेले उपक्रम व्यक्तींच्या वर्तणुकीत सकारात्मक बदल घडवू शकतात, यावर या यशामुळे शिक्कामोर्तब झाले आहे.
‘आरोग्यसंपन्न’मधून मिळालेल्या निष्पत्ती दाखवून देतात की, अत्यंत गरजू शहरी समुदायांमध्ये स्थानिक स्तरावरील प्रयत्न प्रभावी ठरू शकतात. माता व बाल आरोग्य सुधारण्यासाठी समुदाय-केंद्रित मॉडेल किती परिणामकारक असते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. तळागाळातील आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि कुपोषणाशी लढण्यासाठी हा प्रकल्प अनुकरणीय व विस्तारण्यायोग्य मॉडेल ठरत आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information