‘मुंब्राच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू’; सहर शेख प्रकरणानंतर इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

‘मुंब्राच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू’; सहर शेख प्रकरणानंतर इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ
एमआयएम नेत्या सहर शेख यांच्या वादग्रस्त विधानानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी ‘संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू’ असे विधान केल्याने राजकारण तापले; भाजप व हिंदुत्त्ववादी संघटनांचा तीव्र विरोध.
पुणे 2५ जानेवारी २०२६ : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादग्रस्त विधानांमुळे वातावरण तापले आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत AIMIM च्या तिकिटावर विजयी झालेल्या नगरसेविका सहर शेख यांनी “पुढील पाच वर्षांत मुंब्रा पूर्णपणे हिरवा करू” असे वक्तव्य केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या विधानावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेत पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर सहर शेख यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आणि अखेर त्यांनी माफीही मागितली. मात्र हे प्रकरण शांत होत नाही तोच आता AIMIM चे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली आहे.
मुंब्रात सहर शेख आणि इतर नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेतल्यानंतर इम्तियाज जलील यांनी “मुंब्राच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू” असे विधान केले. यासोबतच हिरवा रंग म्हणजे दहशतवाद का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी टीकाकारांवर निशाणा साधला. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली असून, भाजप आणि हिंदुत्त्ववादी संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
इम्तियाज जलील यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की, AIMIM पक्ष सहर शेख यांच्या पाठिशी ठामपणे उभा आहे. त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला उत्तर देण्याची जबाबदारी आपण स्वतः घेऊ, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधला. कारवाई करायची असेल तर ती माझ्यावर करा, असा इशाराही जलील यांनी दिला. त्यांच्या या भूमिकेमुळे AIMIM आक्रमक पवित्र्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सहर शेख यांच्या विधानाबाबत बोलताना जलील यांनी ‘हिरवा’ या शब्दाचा अर्थ वेगळ्या दृष्टीने पाहायला हवा, असे मत मांडले. हिरवा शब्द हा केवळ राजकीय किंवा धार्मिक अर्थाने वापरला जात नाही, तर तो पर्यावरण, झाडे, विकास आणि हरित उपक्रमांशी संबंधितही आहे. मग या विधानाकडे त्या दृष्टीने का पाहिले जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच सहर शेख यांच्याकडून माफी मागण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, इम्तियाज जलील यांच्या विधानावर माजी खासदार नवनीत राणा यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जलील यांच्यावर कडाडून टीका करत म्हटले की, त्यांनी आपली औकात आणि परिस्थिती विसरू नये. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारा राज्य आहे आणि त्याला ‘हिरवा’ करण्याचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. जलील सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडत असल्याचा आरोप करत नवनीत राणा यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
या प्रकरणावर भाजप मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक हिंदुत्त्ववादी संघटनांनीही आक्रमक भूमिका घेतली असून, AIMIM च्या वक्तव्यांवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे. सहर शेख यांच्या विधानानंतर सुरू झालेला वाद आता इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यामुळे अधिकच तीव्र झाला असून, येत्या काळात हा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात गाजण्याची शक्यता आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare