रोहित आर्य एन्काऊंटर : ‘त्या’ मराठी कलाकारांची होणार चौकशी; मानवाधिकार आयोगाची दखल, नवे खुलासे समोर
रोहित आर्य एन्काऊंटर : ‘त्या’ मराठी कलाकारांची होणार चौकशी; मानवाधिकार आयोगाची दखल, नवे खुलासे समोर
पवईतील आर.ए. स्टुडिओमध्ये झालेल्या ओलीस नाट्यानंतर रोहित आर्याचा पोलिस चकमकीत मृत्यू झाला. या प्रकरणात मानवाधिकार आयोगाने दखल घेतली असून, गिरीश ओक, स्वप्निल जोशी, तेजश्री प्रधान यांसारख्या मराठी कलाकारांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सायली मेमाणे
४ ऑक्टोबर २०२५ : मुंबईतील पवई परिसरात घडलेल्या आर.ए. स्टुडिओमधील ओलीस नाट्यप्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. थकबाकीपोटी रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने लहान मुलांना ओलीस ठेवून पोलिसांसमोर अनेक मागण्या केल्या होत्या. पोलिसांनी अतिशय कौशल्याने कारवाई करून १७ मुलांसह १९ जणांची सुटका केली. मात्र चकमकीदरम्यान रोहित आर्याचा गोळी लागून मृत्यू झाला. या प्रकरणी आता मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली असून चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
घटनेनंतर समोर आलेल्या माहितीनुसार, आर्याने शिक्षण विभागासाठी केलेल्या कामानंतर थकबाकी न मिळाल्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलले होते. तथापि, या घटनेच्या आधीपासूनच त्याने मोठी तयारी सुरू केली होती. रोहित आर्याने शॉर्टफिल्मसाठी शेकडो बालकलाकारांचे व्हिडिओ मागवून घेतले होते आणि त्यांपैकी ८० जणांची निवड केली होती. त्यानंतर चार दिवसांचे वर्कशॉप घेण्यात आले ज्यात १७ बालकलाकार सहभागी झाले होते. या काळात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार स्टुडिओत येऊन गेले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित आर्याने ऑडिशनच्या नावाखाली जेष्ठ अभिनेते गिरीश ओक, अभिनेत्री उर्मिला कोठारे, स्वप्निल जोशी, तेजश्री प्रधान, मीनल कपूर आणि अंकुश जोशी यांसारख्या कलाकारांना स्टुडिओमध्ये बोलावले होते. या कलाकारांची आता पोलिस आणि मानवाधिकार आयोगाच्या चौकशीमध्ये नोंद घेतली जाणार आहे. या कलाकारांचा या प्रकरणाशी थेट संबंध नसला तरी चौकशीचा भाग म्हणून त्यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत.
या एन्काऊंटरप्रकरणी जे.जे. रुग्णालयात करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालानुसार रोहित आर्याचा मृत्यू गोळी लागल्यानेच झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोळी लागल्यानंतर त्याच्या वाचण्याची कोणतीही शक्यता नव्हती, असे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आर्याने वॉशरुममधून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळी झाडली.
या प्रकरणात अभिनेत्री ऋचिता जाधव हिचे नावही समोर आले आहे. माहितीप्रमाणे, रोहित आर्याने तिला एका चित्रपटासाठी ऑडिशनसाठी बोलावले होते. त्याने स्वतःला निर्माता म्हणून सादर करत तिला आर.ए. स्टुडिओत बोलावले होते. मात्र, तिच्या घरात त्या वेळी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती असल्यामुळे ती भेट घेऊ शकली नाही, त्यामुळे तिची व रोहितची प्रत्यक्ष भेट झाली नाही. नंतर ऋचिताने स्वतः बोलताना हा खुलासा केला.
या संपूर्ण प्रकरणानंतर आता पोलिस विभाग आणि मानवाधिकार आयोग दोन्ही चौकशी करत आहेत. आर.ए. स्टुडिओला भेट देणाऱ्या प्रत्येक कलाकारांचा जबाब नोंदवला जाणार असून, या घटनेमागील आर्थिक व्यवहार आणि मानसिक दबावाच्या कारणांचीही सखोल चौकशी होणार आहे. मुंबईतल्या मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडवणाऱ्या या प्रकरणाकडे संपूर्ण मराठी कलाविश्वाचे लक्ष लागले आहे.