शिर्डीत भाविकांची लूट थांबणार! नगरपरिषदेचा क्रांतिकारी निर्णय – दरपत्रक अनिवार्य
शिर्डीत भाविकांची लूट थांबणार! नगरपरिषदेचा क्रांतिकारी निर्णय – दरपत्रक अनिवार्य
Shirdi News: शिर्डीतील साईबाबा मंदिर परिसरात भाविकांची फसवणूक थांबवण्यासाठी नगरपरिषदेचा मोठा निर्णय. प्रसाद व फुल-हार दुकानांवर दरपत्रक लावणे अनिवार्य, महागडे दर रोखण्यासाठी कडक अंमलबजावणी.
सायली मेमाणे
पुणे ४ ऑगस्ट २०२५ : शिर्डी हे देशातील एक महत्त्वाचे आणि जागृत देवस्थान असून, येथे दररोज लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. महाराष्ट्रासह देशभरातून येणाऱ्या या भाविकांची सेवा हेच या शहराचे मुख्य वैशिष्ट्य असले तरी गेल्या काही वर्षांपासून येथे भक्तांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. विशेषतः साई मंदिर परिसरातील प्रसाद विक्रेते, फुल-हार दुकानदार यांच्याकडून वस्तूंना वाढीव दर लावून विक्री केली जात असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर शिर्डी नगरपरिषदेनं एक क्रांतिकारी निर्णय घेत भाविकांची लूट थांबवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या निर्णयानुसार, साई मंदिर परिसरातील सर्व दुकानदारांना त्यांच्या वस्तूंवर दरफलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. म्हणजेच प्रसाद, फुल, हार, पूजेचे साहित्य यावर आता एमआरपी (कमाल किरकोळ किंमत) आणि एक्सपायरी डेट स्पष्टपणे दाखवावी लागणार आहे. भाविकांना यामुळे वस्तूंच्या योग्य किमतीबाबत माहिती मिळेल आणि फसवणुकीचे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा आहे.
या निर्णयाचे पालन होत आहे की नाही, हे पाहण्यासाठी शिर्डी नगरपरिषदेचे अधिकारी नियमित तपासणी करत असून अनेक दुकानांवर दरपत्रके झळकलेली दिसत आहेत. भाविकांनी त्या दरपत्रकानुसारच वस्तू खरेदी कराव्यात आणि कोणतीही फसवणूक झाल्यास तत्काळ तक्रार करावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जो दुकानदार हा नियम पाळणार नाही त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
या निर्णयामुळे शिर्डीत येणाऱ्या लाखो भाविकांना दिलासा मिळेल आणि पारदर्शक व्यवहार सुनिश्चित होतील. भाविकांचा अनुभव साकारात्मक व्हावा यासाठी शिर्डी नगरपरिषदेचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद मानला जात आहे.