सांगली पोलीस दलातील शूर श्वान ‘लुसी’चा मृत्यू – अमली पदार्थविरोधी लढ्यात अमूल्य योगदान

सांगली पोलीस दलातील शूर श्वान ‘लुसी’चा मृत्यू – अमली पदार्थविरोधी लढ्यात अमूल्य योगदान
सांगली पोलीस दलातील अमली पदार्थ शोधणाऱ्या श्वान लुसीचा हृदयविकाराने मृत्यू. लुसीने आठ वर्षांच्या सेवेत लाखोंच्या अमली पदार्थांचा साठा उघडकीस आणला होता. पोलिसांनी मानाच्या सलामाने दिला अंतिम निरोप.
सायली मेमाणे
पुणे ३१ जुलै २०२५ : सांगली पोलीस दलातील अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि शूर अमली पदार्थ शोधक श्वान लुसीचा बुधवारी निधन झाला. हृदयविकार व किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या लुसीने आठ वर्षांच्या सेवेत लाखोंच्या किंमतीचा अमली पदार्थ साठा उघडकीस आणत अनेक गुन्हे उघड केले होते. तिच्या निधनामुळे पोलीस दलात आणि श्वान पथकात शोककळा पसरली आहे.

जर्मन शेफर्ड जातीच्या लुसीचा जन्म २ जुलै २०१७ रोजी झाला. राजस्थानच्या अलवर येथील प्रशिक्षण केंद्रात तिने अमली पदार्थ शोधक श्वान म्हणून विशेष प्रशिक्षण घेतले. २०१८ साली सांगली पोलीस दलात दाखल झाल्यानंतर लुसीने उल्लेखनीय कामगिरी केली. २०२० मध्ये इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या कारवाईत लुसीने तेरा लाखांहून अधिक किमतीचा गांजासाठा शोधून काढत दोन आरोपींना अटक करण्यात मदत केली होती.
अनेक मोहिमांमध्ये लुसीने आंतरराज्य नाक्यांवर वाहनांची तपासणी करत संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले. कोल्हापूर विभागीय ड्युटी मीट स्पर्धेतही तिच्या कामगिरीने सांगली श्वानपथकाची मान उंचावली होती.
लुसीचे हस्तक अमलदार तौफिक सय्यद आणि विनोद थोरात यांच्यासोबत तिचे अतूट नाते होते. प्रशिक्षण काळापासूनच तिच्यासोबत काम करणाऱ्या या दोघांना लुसीच्या निधनाने मोठा धक्का बसला. अंतिम निरोप देताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, सतीश शिंदे आणि एन.एस. मोरे यांनी सायंकाळी मानवंदना देत लुसीला अखेरचा निरोप दिला.
मागील महिन्यातच कुपर नावाच्या डॉबरमन श्वानाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे एका महिन्यात दोन कर्तव्यदक्ष श्वानांची सेवा थांबली आहे. सांगली पोलीस दलाच्या अमली पदार्थविरोधी मोहिमेसाठी ही मोठी हानी मानली जात आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter