गणेशभक्तांसाठी लोकल-मेट्रो सुरू ठेवण्याचा पाठपुरावा करणार – मंत्री मंगल प्रभात लोढा

गणेशभक्तांसाठी लोकल-मेट्रो सुरू ठेवण्याचा पाठपुरावा करणार – मंत्री मंगल प्रभात लोढा
गणेशोत्सव काळात भक्तांच्या सोयीसाठी लोकल आणि मेट्रो सेवा रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवण्यासाठी मंत्री मंगल प्रभात लोढा रेल्वे व मेट्रो प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती दिली.
सायली मेमाणे
पुणे ६ ऑगस्ट २०२५ : मुंबईत गणेशोत्सवाचा उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा केला जातो आणि या काळात संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच देशाच्या विविध भागांतून लाखो गणेशभक्त मुंबईत दर्शनासाठी येतात. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी रांगा लागतात आणि त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. हाच मुद्दा लक्षात घेता कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री व मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गणेशभक्तांसाठी लोकल आणि मेट्रो सेवा रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवण्याबाबत रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला आहे.
दक्षिण मुंबईतील महापालिकेच्या डी विभाग कार्यालयात आयोजित जनता दरबारात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना जनतेच्या समस्या थेट ऐकून घेण्याचे निर्देश दिले असून, त्यानुसारच या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात दक्षिण मुंबईत झालेल्या पाच जनता दरबारांमध्ये सुमारे दोन हजार नागरिकांनी त्यांच्या समस्या मांडल्या आहेत.
या दरबारात नागरिकांनी विशेषतः म्हाडा संबंधित पुनर्विकास, संक्रमण शिबिरे आणि दुरुस्ती संदर्भातील अनेक तक्रारी सादर केल्या. काही प्रकरणांमध्ये रहिवाशांना कोणतीही पर्यायी सोय न करता इमारती रिकाम्या करण्यासाठी नोटीसा देण्यात आल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात मंत्री लोढा यांनी म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्यासोबत लवकरच बैठक घेण्याचे जाहीर केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, जेथपर्यंत संक्रमण शिबिराची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत रहिवाशांना घर रिकामे करण्यास भाग पाडू नये आणि शक्य असल्यास जुन्या इमारतींची त्वरित दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा.
लोकशाहीत नागरिकांचे प्रश्न ऐकून घेणे आणि प्रशासन थेट जनतेपर्यंत पोहोचवणे हे खूप गरजेचे आहे. एकाच छताखाली बारा विभागांचे अधिकारी उपस्थित असल्यामुळे नागरिकांची कामे अधिक सहज आणि वेळेत मार्गी लागत असल्याचेही मंत्री लोढा यांनी नमूद केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतुकीसंदर्भातील निर्णय तातडीने घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले. लोकल व मेट्रो सेवा उशिरा पर्यंत सुरू राहिल्यास गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter